गडचिरोली : १५८ आत्मसमर्पित नक्षली बजावणार मतदानाचा हक्क, १५ हजार सुरक्षा जवानाचा फौजफाटा, ०५ अँटी ड्रोन गन देखिल सज्ज

1926

-अतिसंवेदनशिल मतदान केंद्रासह सर्वत्र राहणार नजर
The गडविश्व
गडचिरोली, दि. १६ : जिल्ह्रात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदार संघाकरीता १९ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. गडचिरोली जिल्हा हा माओवादग्रस्त असल्याने माओवादी हे सुरक्षा दलाच्या जवानांवर प्राणघातक हल्ला करणे, स्फोट घडवून आणणे, सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे इ. देशविघातक कृत्य करीत असतात. याबनिवडणूकीच्या अनुषंगाने सदर मतदान प्रक्रिया निर्विघ्नपणेे पार पाडण्यासाठी गडचिरोली पोलीस दल पूर्ण तयारीनिशी सज्ज आहे. या निवडणुकीत १५८ आत्मसमर्पित नक्षली मतदानाचा हक्क बजावणार असून १५ हजार सुरक्षा जवानांचा फौजफाटा तैनात करण्यात आले आहे तसेच जिल्ह्रातील सर्व मतदान केंद्रावर आकाशमार्गाने देखिल सुक्ष्म पाहणी करण्यासाठी अत्याधूनिक १३० ड्रोनसह ड्रोन टीम तसेच माओवाद्यांच्या ड्रोनवर प्रतिहल्ला करण्यासाठी ०५ अँटी ड्रोन गन देखिल सज्ज राहणार आहे.
ही निवडणूक यशस्वीपणे पार पाडण्यासाठी बी.एस.एफ., सी.आर.पी.एफ., सी.आय.एस.एफ., एपीएसपी, एस.आर.पी.एफच्या ४० कंपणी तसेच मुंबई रेल्वे पोलीस, नागपूर रेल्वे पोलीस, पिंपरी चिंचवड, पुणे शहर पोलीस, छत्रपती संभाजीनगर रेल्वे पोलीस, नवी मुंबई पोलीस, पुणे रेल्वे पोलीस असा विविध ठिकाणाहून एकुण १५०० च्या वर तसेच छत्रपती संभाजीनगर, जळगाव व इतर ठिकाणाहून १७५० च्या वर गृह रक्षक दलाच्या सुरक्षा जवानांसह एकुण १५ हजार च्या वर सुरक्षा जवानांचा फौजफाटा जिल्ह्रातील संपूर्ण मतदान केंद्रावर तैनात करण्यात आलेला आहे. निवडणूक बंदोबस्ताकरिता तैनात संपूर्ण सुरक्षा जवानांना निवडणूकीच्या अनुषंगाने उच्च दर्जाचे प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. यासोबतच जिल्ह्रातील ३६१ अतिसंवेदनशिल मतदान केंद्रावर केंद्रीय सशस्त्र पोलीस दल तैनात करण्यात आलेले असून सी-60/ क्यु.ए.टी./ वि.कृ.द./ क्यु.आर.टी पथकाच्या 36 तुकडीमार्फत जिल्ह्रातील अतिसंवेदनशिल जंगल परिसरात माओवादविरोधी अभियान राबविण्यात येणार आहे.
निवडणूक काळात मतदान केंद्रापर्यंत जाण्या-येण्याकरिता वापरण्यात येणा­ऱ्या मार्गावर डी.एस.एम.डी./व्हेईकल माऊंटेड डी.एस.एम.डी चा उपयोग करुन सुमारे 750 कि.मी. रोड ओपनिंग अभियान राबविण्यात येणार आहे. यासोबतच भारतीय वायुसेनेचे 03 एम.आय. 17 व 2 ए.एल.एच आणि भारतीय लष्कराचे 02 ए.एल.एच असे एकुण 07 हेलीकॉप्टर हे गडचिरोली पोलीस दलाच्या मदतीला तैनातीस असून गडचिरोली पोलीस दलाच्या 02 हेलीकॉप्टरसह एकुण 09 हेलीकॉप्टरच्या सहाय्याने गडचिरोलीतील विविध संवेदनशिल व अतिसंवेदनशिल ठिकाणी मतदान कर्मचा­ऱ्यांना पाठविण्यात येणार आहे. गडचिरोली जिल्ह्राच्या सिमावर्ती भागातील आंतरराज्य सिमेवरील राज्यांमार्फत देखिल निवडणूकीच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणावर माओवाद विरोधी अभियान राबविण्यात येणार आहे.

यासोबतच आज १६ एप्रिल (पी-3) रोजी सकाळपासून भारतीय वायुसेनेच्या एम.आय १७ आणि भारतीय लष्कराच्या ए.एल.एच. हेलीकॉप्टरच्या मदतीने ६९-अहेरी विधानसभा मतदार संघातील ६८ मतदान केंद्रावरील २९५ मतदान कर्मचा­ऱ्यांना मतदान केंद्रावर पाठविण्याची प्रक्रिया सुरु आहे. निवडणूक काळात पोलीस दल हे निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण वातावरणात व यशस्वीपणे पार पाडण्याकरिता बंदोबस्तात तैनातीस असल्याने त्यांना स्वत:चे मतदान करता येत नव्हते. याचा सारासार विचार करुन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फतीने गडचिरोली पोलीस दलासाठी १३ एप्रिल ते १५ एप्रिल २०२४ असे तीन दिवस आरमोरी, अहेरी व गडचिरोली याठिकाणी टपाली मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिल्याने गडचिरोली पोलीसांमार्फत एकुण ६१५ टपाली मतदान करण्यात आले आहे. यासोबतच १५८ आत्मसमर्पित माओवादी हे लोकसभा सार्वात्रिक निवडणूक – २०१४ करिता मतदान करुन आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ च्या अनुषंगाने निवडणूक ही शांततापूर्ण वातावरणात निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी संपूर्ण केंद्रीय सशस्त्र पोलीस दल, विविध राज्यातील पोलीस दल तसेच राज्यातील विविध विभागातील पोलीस दल, गृह रक्षक दल हे पोलीस अधीक्षक नीलोत्पल., अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक अहेरी एम. रमेश, यांच्या मार्गदर्शनाखाली सज्ज आहेत. यावेळी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी जिल्ह्रातील नागरिकांना भयमुक्त वातावरणामध्ये पुढे येऊन सर्वांनी मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #loksabhaelection2024 )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here