The गडविश्व
गडचिरोली : महाराज्स्व अभियानांतर्गत जिल्हयात उद्या 9 फेब्रुवारी रोजी तहसिलदार स्तरावर फेरफार अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. तहसिल स्तरावर एक महिन्याच्या वर प्रलंबित असलेल्या साध्या व विवादग्रस्त फेरफार यांची संख्या निश्चित करण्यात आली आहे. त्यानूसार अदालतीच्या दिवशी प्रलंबित फेरफार नोंदीच्या संदर्भात अर्जदार व हरकतदार यांना आवश्यक त्या पुराव्यांसह उपस्थित राहण्याच्या सूचना याअगोदरच देण्यात आलेल्या आहेत. अदालतीमध्ये प्रलंबित फेरफार उपलब्ध अभिलेखावरून नियमानूसार असल्याचे निष्पन्न होत असल्यास त्याच दिवशी प्रमाणित करण्यात येणार आहे.
याच महिनाअखेर जिल्हयातील सर्व मुदत पुर्ण झालेल्या प्रलंबित फेरफार प्रकरणे निकाली काढली जाणार आहेत. 9 फेब्रुवारी रोजी होणारी फेरफार अदालत जिल्हयात एकूण 21 ठिकाणी तालुका व मंडळ स्तरावर आयोजित करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी या अदालतीसाठी पर्यवेक्षण अधिकाऱ्यांची नेमणूक केलेली आहे. पर्यवेक्षण अधिकारी सदर अदालतीबाबत उपस्थित राहून सनियंत्रण करणार आहेत. फेरफार अदालत यशस्वीपणे राबवून जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढण्याच्या सूचना जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी तहसिलदार व पर्यवेक्षण अधिकारी यांना दिल्या आहेत.
“गडचिरोली जिल्हयात महाराजस्व अभियान चांगल्या प्रकारे राबवून सर्वसामान्यांना आवश्यक सेवा वेळेत उपलब्ध करून दिल्या जात आहेत. याचाच भाग म्हणून दि.09 फेब्रुवारी रोजी जिल्हयात 21 ठिकाणी फेरफार अदालत आयोजित करण्यात आली आहे. प्रशासन अशा अदालतीमधून जास्तीत जास्त प्रलंबित फेरफार प्रकरणांचा निपटारा करणार आहे. आम्ही तालुक्याला याबाबत सूचना दिलेल्या आहेत. या महिनाअखेर मुदत पूर्ण झालेले सर्व फेरफार निकाली काढण्यासाठी नियोजन केले आहे.”
– संजय मीणा
जिल्हाधिकारी, गडचिरोली