राज्य उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

1034

– बिअर शॉपीच्या परवान्यासाठी मागितली लाच
The गडविश्व
चंद्रपूर, दि. ०८ : बिअर शॉपीचा परवाना मंजुर करून देण्याचे कामाकरीता १ लाख रुपयांची लाच रकमेची मागणी करून स्वीकारल्या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभाग, चंद्रपूर येथील अधीक्षक संजय पाटील यांच्यासह दुयम निरीक्षक चेतन खारोडे व कार्यालय अधीक्षक अभय खताळ यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूरच्या पथकाने रंगेहात पकडले. सदर कारवाईने राज्य उत्पादन शुल्क विभागात खळबळ उडाली आहे.
तक्रारदार यांचे घुग्घूस येथे “गोदावरी बार ॲन्ड रेस्टॉरंट” या नावाने बार असून त्यांना नवीन बिअर शॉपीचा परवाना काढायचा असल्याने नोव्हेंबर २०२३ मध्ये राज्य उत्पादन शुल्क विभाग, चंद्रपूर येथे परवाना मिळण्याकरीता अर्ज सादर केला होता. परंतु राज्य उत्पादन शुल्क विभाग, चंद्रपूर चे अधीक्षक संजय पाटील आणि दुयम निरीक्षक चेतन खारोडे यांनी तक्रादार यांना आज या, उदया या असे म्हणून टाळाटाळ केली व परवाना मंजुर केला नाही. चेतन खारोडे यांनी तक्रारदार यांना बिअर शॉपीचा परवाना मंजुर करून देण्याचे कामाकरीता संजय पाटील यांचे व स्वतः करीता १ लाख रुपयांची मागणी केली होती.
तक्रारदार यांची लाच रक्कम देण्याची मुळीच ईच्छा नसल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूर येथे तक्रार दाखल केली. तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणी करून ७ मे रोजी सापळा कारवाई दरम्यान दुयम निरीक्षक चेतन खारोडे यांनी तक्रारदार यांना १ लाख रुपयांची मागणी करून कार्यालय अधीक्षक अभय खताळ यांचे मार्फतीने स्विकारल्याने ७ मे रोजी पो.स्टे. चंद्रपूर शहर, जि. चंद्रपूर येथे गुन्हा नोंद करण्याची कार्यवाही सुरु आहे.
सदर कारवाई राहुल माकणीकर, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपुर, संजय पुरंदरे, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर यांचे मार्गदर्शनात पोलीस उप अधीक्षक श्रीमती मंजुषा भोसले, ला.प्र. वि. चंद्रपूर, तसेच कार्यालयीन स्टॉफ पो. हवा. नरेशकुमार नन्नावरे, पो. हवा. हिवराज नेवारे, ना.पो.अं. संदेश वाघमारे, पो. अ. राकेश जांभुळकर, पो.अ. प्रदिप ताडाम, म.पो.अं. पुष्पा काचोळे व चापोकों सतिश सिडाम यांनी यशस्वी पार पाडली आहे.

(#thegdv #thegadvishva #chandrpurnews #acbtrap #crimenews #Three officers including State Excise Superintendent in ACB’s net)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here