-जिल्हाभरात बनावट सुगंधित तंबाखूचा वापर
The गडविश्व
आरमोरी, दि. ०९ : तालुका बनावट सुगंधित तंबाखूचा हब होत चालला असून या बनावट सुगंधित तंबाखूचा जिल्हाभरात वापर होतांनाचे चित्र असून दररोज लाखोंच्या घरात उलाढाल होत असल्याचे बोलल्या जात आहे.
जिल्ह्यात आधीच अवैध व्यवसायाला उधाण आले असून यावर आला घालण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षकांनी प्रत्येक पोलीस स्टेशन, पोलीस मदत केंद्र यांना कारवाई करण्याचे सक्त आदेश दिले आहेत. मात्र तरीसुद्धा काही निडर अवैधरित्या व्यवसाय करणारे त्याला न जुमानता छुप्या मार्गाने अवैध व्यवसाय जोमात करित आहे. अशातच आरमोरी तालुक्यात बनावट सुगंधित तंबाखूचा व्यवसाय फोफावला आहे. त्याची मुळे जिल्हाभरात पसरल्याचे समजत असून लाखोंची उलाढाल होत आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष कसे होत आहे तसेच यावर आशीर्वाद कोणाचा असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे.
आरमोरी तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक वर्षापासून बनावट सुगंधित तंबाखू विक्रीचा अवैध व्यवसाय जोमात सुरू आहे. या व्यवसायाला कुठूनतरी खतपाणी मिळत असून हा व्यवसाय करणाऱ्यांचे सुगीचे दिवस आल्याचे चित्र आहे तर यातून अनेकांनी मोठी माया जमा केल्याचे बोलल्या जात आहे. गेल्या अनेक वर्षापासून हा व्यवसाय खुलेआम सुरू असल्याने व्यवसायिक मालामाल झाले आहे. बनावट सुगंधित तंबाखू व्यावसायिकांची वैरागड , ठाणेगाव, आरमोरी, पिसेवडधा ही प्रमुख केंद्र असल्याचे समजते. देसाईगंज येथील ठोक व्यावसायिकाकडून आरमोरी येथील किराणा दुकानदारांना बनावट सुगंधित तंबाखूचा पुरवठा केला जातो. लहान किराणा दुकानांना हा माल पुरवठा केला जातो व नंतर किराणा दुकानातून माल पान टपरीवर पोहचविला जातो. जिल्हाभरात याचे मोठे नेटवर्क असून जिल्ह्यातील अनेक भागात बनावट सुगंधित तंबाखूचा वापर केल्या जात आहे. नागपूर तसेच छत्तीसगड राज्यातून साधा तंबाखू आणल्या जावून त्यावर केमिकलद्वारे प्रक्रिया करून बनावट सुगंधित तंबाखू तयार केले जाते. जिल्ह्यातील शहरी व तालुक्यातील ग्रामीण भागात बनावट सुगंधित तंबाखूची पोहोच केली जात असून अशा या बनावट सुगंधित तंबाखूद्वारे खर्रा तयार केला जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे नवीन रोग निर्माण होण्याची शक्यता आहे. तालुका हब झाला असला तरी गेल्या काही दिवसांपूर्वी स्थानिक गुन्हे शाखेने अवैधरित्या वाहतूक करिता असलेला १८ लाखांचा सुगंधित तंबाखू जप्त केल्याची कारवाई करण्यात आली होती. तालुका हब झाला असताना स्थानिक प्रशासन बघ्यांची भूमिका बजावत आहेत असे दिसून येत असून स्थानिक गुन्हे शाखा कारवाई करते मात्र स्थानिक पोलिसांचे दुर्लक्ष कसे असा प्रश्न उपस्थित होत आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #crimenews #armori)