– चकमकीत २२ लाखांचे बक्षीस असलेल्या पुरुष कमांडरसह दोन महिला सदस्यांना कंठस्नान
The गडविश्व
गडचिरोली, दि.१४ : जिल्ह्यातील नक्षल्यांच्या पेरमिली दलममधील उर्वरित तीन नक्षल्यांना १३ मे रोजी गडचिरोली पोलिसांनी भामरागड तालुक्यातील कतरंगट्टा गावाजवळील जंगल परिसरात चकमकीत कंठस्नान घालत संपूर्ण पेरमिली दलमचा नायनाट केला आहे. अशी माहिती पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी पत्रकार परिषदेतून दिली. पत्रकार परिषदेला पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता उपस्थित होते.
जिल्ह्यात नक्षल्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली असली तरी शेजारच्या छत्तीसगड, तेलंगाना राज्यातून नक्षली गडचिरोली जिल्ह्यात हिंसक कारवाया करताना दिसतात. अशातच जिल्ह्यातील पेरमिली दलममध्ये शेवटचे तीन नक्षली होते त्यांना काल १३ मे रोजी सकाळच्या सुमारास भामरागड तालुक्यातील कतरंगट्टा गावाजवळील जंगल परिसरात झालेल्या चकमकीत गडचिरोली पोलिसांनी ठार करत यमदसनी पाठविले आहे. ठार झालेल्या नक्षल्यांमध्ये पेरमिली दलमचा कमांडर वासु समर कोरचा, रा. गोडीया, पूर्व बस्तर एरीया (छ.ग)(डीव्हीसीएम), महिला सदस्या रेश्मा मडकाम (वय २५), रा. बस्तर एरीया (छ.ग.), कमला मडावी (वय २४), रा. दक्षिण बस्तर एरीया (छ.ग.) यांचा समावेश आहे. त्यांच्यावर अनुक्रमे १६ लाख, ४ लाख व २ लाख असे एकत्रित २२ लाखांचे बक्षीस महाराष्ट्र शासनाने घोषीत केले होते.
फेब्रुवारी ते मे महिन्या दरम्यान नक्षली टीसीओसी कालावधी साजरा करतात. यावेळी ते विध्वंसक कारवाया करण्याचा प्रयत्न करीत असतात. त्याच पार्श्भूमीवर पेरमिली दलमचे काही नक्षली भामरागड तालुक्यातील कतरंगट्टा गावाजवळील जंगल परिसरात तळ ठोकुन असल्याच्या गोपनीय माहितीच्या आधारे अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख यांच्या नेतृत्वात गडचिरोली पोलीस दलाच्या सी ६० पथकाचे दोन तुकड्या तातडीने सदर जंगल परिसरात नक्षलविरोधी अभियान राबवित असताना जंगलात आधीच दबा धरून बसलेल्या नक्षल्यांनी जवानांच्या दिशेने अंधाधुंद गोळीबार केला. जवानांनीही प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. जेमतेम एक तास चाललेल्या या चकमकीत पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षली जंगलात पसार झाले. चकमकीनंतर परिसराची झडती घेतली असता एक पुरुष व दोन महिला नक्षल्यांचे मृतदेह आढळून आले. त्यात पेरमिली दलमचा कमांडर वासु समर कोरचा, महिला सदस्या रेश्मा मडकाम, कमला मडावी यांचा समावेश आहे. घटनास्थळावरुन ०१ नग एके ४७ रायफल, ०१ नग कार्बाइन रायफल, ०१ नग इन्सास रायफल व इतर स्फोटक साहीत्यासह मोठ्या प्रमाणात नक्षली साहित्य गडचिरोली पोलिस दलाने हस्तगत केले.
‘या’ गुन्ह्यात होता सहभाग
दलम कमांडर वासु समर कोरचा याचा १ खुन, ०५ चकमक व ०१ दरोडा असे एकुण ०७ गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्रामध्ये प्रत्यक्ष समावेश होता. त्यावर शासनामार्फत १६ लाख रूपयांचे बक्षीस जाहीर होते.
रेश्मा मडकाम, हिला नुकतीच दलममध्ये जबाबदारी देण्यात आलेली होती. हिचा ०१ खुन, ०५ चकमक अश्या एकुण ०६ गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्रामध्ये तिचा प्रत्यक्ष समावेश होता. शासनाने एकुण ०४ लाख रूपयांचे बक्षीस तिच्यावर जाहीर केले होते.
तर कमला मडावी ही दलममध्ये सदस्य होती. हिचा ०२ खुन, ०५ चकमक अश्या एकुण ०७ गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्रामध्ये तिचा प्रत्यक्ष समावेश होता. शासनाने एकुण ०२ लाख रूपयांचे बक्षीस तिच्यावर जाहीर केले होते.
गेल्या ३ वर्षात जिल्ह्यातील एकाचीही नक्षल्यात भरती नाही
गेल्या ३ वर्षामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील एकाचीही नक्षल्यांमध्ये भरती झाली नाही. यासाठी पोषक ठरले ती गडचिरोली महा मॅरेथॉन स्पर्धा.
गडचिरोली पोलीस दलातर्फे गडचिरोली जिल्ह्रातील दुर्गम अतिदुर्गम भागातील आदिवासी युवक-युवतींना स्पर्धेच्या माध्यमातून एक संधी निर्माण व्हावी, तसेच आदिवासी भागात विकास व्हावा यासाठी सामाजिक बांधीलकीच्या दृष्टीने, आदिवासी समाजाच्या विकास व सन्मानास्तव भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. या स्पर्धेत हजारो नागरिक सहभाग घेत असतात. आणि हीच स्पर्धा पोषक ठरली असून गेल्या ३ वर्षात जिल्ह्यातील एकही नागरिक नक्षल्यांमध्ये भरती झाला नाही असेही पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी पत्रकार परिषदे दरम्यान सांगितले.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #permilidalamend #bhamragdh #c60 #crimenews )