गडचिरोली : अवैध होर्डिगवर कारवाई होणार, शासकीय कार्यालयाच्या परिक्षेत्रात शासकीय होर्डिंग असणे आवश्यक

523

– जिल्हाधिकारी संजय दैने यांनी घेतला आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचा आढावा
The गडविश्व
गडचिरोली दि. १६ : मुंबईतील होर्डिंग दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अवैध होर्डिंग बाबत नगर परिषदेने काय कारवाई केली याबाबत जिल्हाधिकारी संजय दैने यांनी विचारणा केली. तसेच शासकीय कार्यालयाच्या परिक्षेत्रात शासकीय होर्डिंग शिवाय दुसरे कोणतेही होर्डिंग असू नये. आपल्या हद्दितीलअवैध होर्डिंग तातडीने काढावे. दुर्घटना घडल्यास संबंधित परीक्षेत्रातील अधिकाऱ्याला यासाठी जबाबदार ठरवून कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी संजय दैने यांनी दिला. ते जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आज आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेची आढावा बैठक जिल्हाधिकारी संजय दैने यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली यावेळी ते बोलत होते.
दरम्यान जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नद्या व धरणाचा पाणीसाठा आहे. आपल्याकडे पाऊस असला किंवा नसला तरी इतर जिल्ह्यातील धरणाच्या विसर्गाचे पाणी नदीद्वारे जिल्ह्यात येवून पूर परिस्थतीत उद्भवू शकते. यामुळे मान्सून कालावधीत कोणत्याही आपत्तीचा सामना करण्यासाठी यंत्रणेने 24 तास अलर्ट राहण्याच्या सूचनाही यावेळी जिल्हाधिकारी संजय दैने यांनी दिल्या.
या आढावा बैठकीला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह. सहायक जिल्हाधिकारी सर्वश्री राहुल मीना, आदित्य जीवने, श्रीमती मानसी, अप्पर जिल्हाधिकारी विजय भाकरे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रकाश पाटील उपस्थित होते.
आपत्ती परिस्थिती हाताळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना आतापासूनच राबविण्याचे व दुर्घटनेस कारणीभूत ठरणाऱ्या मानवी चुका टाळण्यावर विशेष भर देण्याचे त्यांनी सांगितले. अधिकाऱ्यांनी नद्या व पुर्वीची पूर परिस्थिती आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना अभ्यासाव्या. आपल्या भागातील जेसीबी चालक पोकलँन्ड, खोल पाण्यात पोहणारे तैराक, बचाव पथकातील तरूण, यांची यादी तयार ठेवावी. वेळोवेळी तुटलेली झाडे उचलणे, मलबा हटवणे, गाव-खेड्यातील नदीनाल्यांवरील छोटे पूल दुरुस्त करून घेणे, पाणी सुरळीत जाण्यासाठी त्यांची साफसफाई करणे, यात्रेच्या ठिकाणी रस्ते मोकळे राहतील व अतिक्रमण होणार नाही याबाबत दक्षता घेणे, धोकादायक म्हणून प्रमाणित केलेल्या इमारती तसेच बंद व वापरात नसलेल्या जुन्या शासकीय इमारती तातडीने पाडाव्यात. सामुदायिक आरोग्य केंद्रात सर्प चावल्यानंतर द्यावयाची औषधी उपलब्ध ठेवावी.
ग्रामपंचायतींनी पाण्याची पाण्याच्या स्रोताची स्वच्छता तसेच नालेसफाई करून घ्याव. हॅन्डपंप, विहीर मध्ये ब्लिचिंग पावडर टाकावे. पिण्याच्या पाण्याजवळ सांडपाण्याचे डबके साचू नये व असल्यास तातडीने त्यावर उपाययोजना करण्याचे जिल्हाधिकारी श्री दैने यांनी सांगितले.
जिल्ह्यातील ४७ गावे नदीकिनाऱ्यावर असून ११२ गावांमध्ये दोन महिन्यासाठी तर ६७ गावे दोन आठवड्यांपर्यंत वाहतूक संपर्कात नसतात. त्यामुळे अशा गावांमध्ये किमान चार महिन्याचे राशन व औषध साठा तातडीने उपलब्ध करावा व सदर धान्यसाठा पोहचला की नाही याची खात्री करावी. यासोबतच या गावातील पुढील चार महिन्यात प्रसुतीची तारीख असलेल्या गर्भवती महिलांना इतर जवळच्या शासकीय आरोग्य केंद्रात दाखल करून त्यांच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था करावी तसेच त्यांच्या सोबतच्या महिला व बालकांना देखील रिक्त वार्डात राहण्याची जागा उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.
मान्सून कालावधीत तहसीलदार यांच्या परवानगीशिवाय पाण्यात बोट, होडी, डोंगा नेता येणार नाही. रस्त्यावरून पुलाचे पुराचे पाणी जात असताना गाडी टाकू नये. मेंदूज्वर, मलेरिया, गॅस्ट्रो आदी दूषीत पाणी व डासांमुळे होणारे रोग टाळण्यासाठी गावागावात बैठक घेऊन स्वच्छता ठेवण्याबाबत जनजागृती करावी. वीज पडून जीवीत हाणी होऊ नये यासाठी जिल्ह्यात वीज प्रतिरोधक यंत्रणा मोठ्या प्रमाणात उभारण्याचे त्यांनी सांगितले. तसेच पावसात झाडाखाली आसरा न घेण्याबाबत जनजागृती करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
आपत्ती व्यवस्थापन सल्लागार कृष्णा रेड्डी यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली. बैठकीला सर्व तहसीलदार गटविकास अधिकारी, सिंचन विभाग, आरोग्य विभाग, पोलीस विभाग, विद्युत विभाग व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #hording #sanjaydaine )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here