पशुपालकांनी आपल्या जनावरांना इयर टॅगिंग करावे : जिल्हाधिकारी संजय दैने

138

पशुपालकांनी आपल्या जनावरांना इयर टॅगिंग करावे : जिल्हाधिकारी संजय दैने
The गडविश्व
गडचिरोली,दि.१७ : राज्यातील सर्व पशुधनास ईअर टॅगिंग करुन त्यांची नोंदणी भारत पशुधन प्रणालीवर करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पशुधनाला ईअर टॅगिंग करणे व त्याची नोंदणी भारत पशुधन प्रणालीवर करण्याचे कार्य सातत्याने सुरु असून पशुपालकांनी त्यांच्या जनावरांना इयर टॅगिंग करून माहिती अद्यावत करुन घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी संजय दैने यांनी केले आहे.
०१ जून २०२४ नंतर ईअर टॅगिंग शिवाय पशुधनास पशुवैद्यकीय संस्था / दवाखान्यामधून पशुवैद्यकीय सेवा देय होणार नाही. तसेच कत्तल खान्यामध्ये ईअर टॅग असल्याशिवाय म्हैसवर्गीय जनावरांची कत्तल करण्यास परवानगी देण्यात येणार नाही. नैसर्गीक आपत्ती, विजेचा धक्का तसेच वन्य पशुंच्या हल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या पशुधनास ईअर टॅगिंग केलेली नसल्यास नुकसान भरपाईची रक्कम देय होणार नाही. तसेच कोणत्याही पशुधनाची वाहतुक ईअर टॅगिंग असल्याशिवाय करता येणार नाही, तसे केल्यास पशुधनाचे मालक व वाहतुकदार यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. ईअर टॅग नसलेल्या पशुधनाची बाजार समित्या, आठवडी बाजार व गावा- गावातील खरेदी विक्री व बैलगाडया शर्यती करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. पशुधनाच्या मालकी हस्तांतरणबाबतच्या नोंदी संबधीत पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडून त्वरीत अद्यावत करुन घेण्याची जबाबदारी संबधीत पशुपालकांची राहिल. ग्रामपंचायतीमध्ये पशुंच्या विक्री किंवा परिवर्तनाच्या दाखला देतांना पशुधनाची ईअर टॅगिंग झाल्याशिवाय तो देण्यात येवु नये. दाखल्यावर ईअर टॅगिंग क्रमांक नमुद करण्यात यावा, असे आदेश जिल्हाधिकारी, गडचिरोली, संजय दैने यांनी पारित केलेले असून सर्व पशुपालकांनी वेळीच आपल्याकडील जनावरांना टॅगिंग करुन घेवुन गैरसोय टाळावी असे जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. विलास गाडगे यांनी कळविले आहे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #sanjaydaine )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here