‘तंबाखू विष आहे’, मुलचेरातील ९ गावे तंबाखूविक्रीमुक्त

101

-खर्ऱ्यापासून दूर राहण्याचे आवाहन
The गडविश्व
गडचिरोली, दि. ३१ : मुलचेरा तालुक्यातील अडगेपल्ली, फुसकी चक, फुसकी माल, गंगापूर, गरंजी, गोविंदपूर, हेटळकसा, सुरगाव व मोरखेडी रिठ या ९ गावांमध्ये मागील वर्षांपासून तंबाखूविक्री बंद आहे. या गावातुन तंबाखूजन्य पदार्थ हद्दपार करण्यासाठी मुक्तिपथच्या मार्गदर्शनाखाली गाव संघटनेने अथक परिश्रम घेऊन आपल्या गावातील खर्रा विक्रीवर बंदी घातली. आज जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त आपल्या मुलांना खर्रा खाऊ देऊ नका, असे आवाहन या गावांच्या माध्यमातून करण्यात आले.
अडगेपल्ली येथे ५ वर्षांपासून खर्रा विक्री बंद असून विक्री करताना आढळून आल्यास ३ हजारांचा दंड वसूल करण्यात येतो. गोविंदपूर येथे १० वर्षांपासून तंबाखूजन्य पदार्थ विक्री बंद असून विक्रेत्यांवर व खाणाऱ्यांवर ५ हजारांचा दंड आकारण्यात येतो. फुसकी माल येथेही विक्री बंद आहे. गरंजी येथे गावात एका कार्यक्रमादरम्यान पदमश्री डॉ. अभय बंग, माजी जिप अध्यक्ष कुत्तरमारे, जिप शिक्षक कारगिरे यांचे व्याख्यान झाले तेव्हा ग्रामस्थांच्या लक्षात आले की गाव विकासासाठी तंबाखू बंदीचा निर्णय ग्रामसभेच्या माध्यमातून घेण्यात आला. आता ६ वर्षांपासून तंबाखूमुक्त गाव असून गाव विकासाकडे वाटचाल करीत आहे. सुरगाव येथे ३ वर्षांपासून तंबाखूविक्री बंद आहे. फुसकी चक येथे ५ वर्षांपासून तंबाखूविक्री बंदी आहे. हेटळकसा येथे ३ वर्षांपासून तंबाखूविक्री बंद आहे. मोरखेडी येथे ४ वर्षांपासून तंबाखूविक्री बंदी झाली आहे. संबंधित गावातून तंबाखूजन्य पदार्थ हद्दपार करण्यासाठी मुक्तिपथ व गाव संघटनेच्या माध्यमातून अथक परिश्रम घेण्यात आले.
खर्रा विष आहे, खर्रा ला नाही म्हणा, मुलांच्या हातात खर्रा नको, खाऊ असावा असा संदेश या ९ गावांच्या माध्यमातून देण्यात आला. या गावाचा आदर्श घेऊन इतरही गावांनी आपल्या गावांमध्ये तंबाखूविक्री बंदी लागू करावी व आपल्या मुलांना कँसर पासून वाचवावा, असे आवाहन मुक्तिपथ तालुका संघटक रुपेश अंबादे व चमूने केले आहे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #armori #muktipath #mulchera )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here