आपसी समन्वयातून शासकीय योजनेचे लाभ नागरिकांपर्यत पोहोचावा : जिल्हाधिकारी भाकरे

108

– आरोग्य यंत्रणेचा समग्र आढावा
– प्रत्येकाचे आधार कार्ड व बँक खाते काढण्‍यासाठी विशेष मोहिम*
The गडविश्व
गडचिरोली दि. ११ : प्रत्येक व्यक्तीचा विकास हा केंद्रबिंदू ठेवून शासनामार्फत नागरिकांकरिता विविध योजना राबविल्या जातात. या योजनांची माहिती त्यांचेपर्यंत पोहोचवून योजनेचा लाभ दुर्गम व अतिदुर्गम भागातील गरजूंना मिळावा यासाठी सर्व विभागाच्या तालुकास्तरीय व ग्रामस्तरीय यंत्रणेने आपसात समन्वय राखून एकत्रितपणे काम करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी आज दिल्या.
जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आज आरोग्य यंत्रणेचा आढावा घेण्यात आला. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सतिश सोळंके प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी यांनी पुढे सांगितले की लोकांना सक्षम करणे हाच शाश्वत विकासाचा मार्ग असून यासाठी नागरिकांना त्यांच्यासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची जनजागृतीद्वारे जाणीव करून द्यावी. आरोग्य विभागाकडे असलेल्या संसाधने व उपलब्ध सुविधांचा पुरेपूर वापर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
शासनाच्या विविध योजना या आधार संलग्न असल्याने आधार कार्ड व केवायसी झालेले बँक खाते प्रत्येक नागरिकाकडे असणे आवश्यक आहे. त्याअभावी कोणीही शासकीय योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये म्हणून विशेष मोहिम राबवून 100 टक्के नागरिकांचे आधार कार्ड व बँक खाते काढावे, यासाठी गावनिहाय सर्व्हेक्षण करण्यासाठी सूचनाही जिल्हाधिकारी भाकरे यांनी दिल्या.
मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी पावसाळ्यात आरोग्य विभाग व महसूल विभागात समन्वय राहावा यासाठी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांची यादी महसूल विभागाला उपलब्ध करून देण्याचे सांगितले. ग्रामीण भागातून रूग्णाला जिल्हा मुख्यालयात पाठविण्याची शिफारस करतांना त्याबाबत उपचारासाठी पूर्वतयारी करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक यांना तातडीने पूर्वसूचना देण्याचे निर्देशही श्रीमती सिंह यांनी तालुका आरोग्य यंत्रणेला दिले. पावसाळा कालावधीत दुर्गम भागातील प्रसुती होणार असलेल्या गरोदर महिला यांच्या नियमित संपर्कात राहणे, सर्व महिलांची प्रसुती दवाखाण्यातच होईल याबाबत अलर्ट राहणे, गरोदर मातांना तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनापासून परावृत्त करणे, बालमृत्यू रोखण्यासाठी गरोदर मातांना योग्य आहार मिळतो का याची खातरजमा करणे आदी सूचना त्यांनी दिल्या.
यावेळी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, नियमित लसिकरण कार्यक्रम, वातावरणातील बदल आणि मानवी आरोग्य, गाभा समिती, साथरोग सर्वेक्षण, क्षयरोग दुरीकरण आदि विषयांतर्गत विविध बाबींचा आढावा घेण्यात आला. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिंदे यांनी जिल्ह्यातील आरोग्‍य यंत्रणेची माहिती सादर केली.
बैठकीला सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिक्षक, बाल विकास अधिकारी व इतर संबंधीत अधिकारी उपस्थित होते.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #gadchirolicollector )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here