विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्ग व धनगर समाज प्रवर्गातील समाज बांधवांनी घरकुल योजनेचा लाभ घ्यावा

1228

The गडविश्व
गडचिरोली,दि.१२ : विमुक्त जाती भटकया जमाती व धनगर समाज प्रवर्गातील समाज बांधवांनी घरकुल योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन मडावी यांनी केले आहे.
ग्रामीण क्षेत्रासाठी संबंधित ग्रामपंचायत अंतर्गत ठराव घेवुन घरकुल योजनेकरीता पात्र अर्जदारांचे प्रस्ताव अर्ज ग्रामपंचायतीच्या माध्यमाने पंचायत समिती, गटविकास अधिकारी यांचे मार्फत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयास यादीसह सादर करावे.
विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच धनगर समाज या प्रवर्गातील कुटुंबाचे राहणीमान उंचावणे, त्यांचे उत्पन्नाचे स्त्रोत वाढुन त्यांना स्थिरता प्राप्त व्हावी. त्यांना विकासाच्या मुळ प्रवाहात येता यावे, या उददेशाने राज्यात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ग्रामीण भागातील विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गातील घटकांसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना तसेच धनगर समाज भटक्या जमाती-क प्रवर्गाच्या विकासासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत राबविण्यात येत आहे.
ग्रामीण भागात किमान १० कुटुंबासाठी सामुहिक वसाहत योजना राबवुन अथवा रमाई आवास योजनेच्या धर्तीवर वैयक्तिक स्वरुपात घरकुलाचा लाभ देण्यात येतो. यासाठी सक्षम अधिका-यांने दिलेले जातीचे प्रमाणपत्र, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. १.२० लाख पेक्षा कमी असल्याचे उत्पन्न प्रमाणपत्र तसेच महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र, कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने महाराष्ट्र राज्यात इतर कोणत्याही ठिकाणी घरकुल योजनेचा लाभ घेतला नसल्याबाबतचे १०० रु. स्टॅम्प पेपरवर शपथपत्र लाभार्थी कुटुंबाचे स्वत:चे मालकीचे घर, भुखंड असल्याचा पुरावा, नमुना-8 किंवा ७-१२ उतारा दस्त नोंदणीची प्रत, घराचे सद्यास्थितीचे छायाचित्र, ग्रामसभेचा ठराव, अर्जदाराचे आधार ओळखपत्र, बँक पासबुक, राशन कार्ड, जॉबकार्ड, घरकर पावती आदी कागदपत्रासह अर्ज संबंधित ग्रामपंचायतीमध्ये सादर करावे. अधिक माहितीकरीता 07132-222192 या क्रमांकावर संपर्क साधावा असे समाज कल्याण विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here