रक्तदान ही जीव वाचविण्याची प्रक्रिया

1248

 

मेंदूला निरंतर मिळणाऱ्या ऑक्सीजनयुक्त रक्तप्रवाहामुळे सजीवांना जिवंतपणा लाभला आहे. म्हणूनच रक्तदान हे श्रेष्ठदान असे म्हटले जाते. रक्त कोणत्या कारखान्यात किंवा कृत्रिमरित्या तयार होत नाही, तर ते फक्त नैसर्गिकरित्या सजीवांच्या शरिरामध्ये तयार होते.
दिवसेंदिवस वाढते अपघात, वेगवेगळ्या शस्त्रक्रिया किंवा अनेक आजार, प्रसुतिच्या वेळी अधिक रक्तस्त्रावामुळे झालेली रक्ताची कमतरता अशा वेळी रक्ताची नित्तांत गरज भासते, तसेच सिकलसेल, कर्करोग, हिमोफिलिया, थॅलेसेमिया, पंडूरोग (ॲनिमिया), या रुग्णांना रक्ताची व रक्तघटकांची सतत मागणी वाढत आहे. सततच्या वाढत्या मागणीमुळे सर्वच रक्तपेढ्यांमध्ये रक्त मुबलक असणे गरजेचे आहे.
जगभरातून फक्त आपल्या भारत देशाची लोकसंख्या १३५ कोटींपेक्षा जास्त असूनही केवळ ०.६ टक्के लोक रक्तदान करतात, परिणामतः फक्त ७४ लाख ते सव्वा कोटी लाख लिटर रक्त संकलित होते. रक्त न मिळाल्यामुळे घडणाऱ्या मृत्यूचे प्रमाण देशभरात १५ ते २० टक्के आहे.
रूग्ण सेवेवर परिणाम होऊ नये म्हणून काळाची गरज ओळखून आपण स्वेच्छेने नियमित रक्तदान करणे आवश्यक आहे. परंतु रक्तदानाविषयी गंभीरता दिसून येत नाही. कारण रक्तदानाबाबत समाजात वेगवेगळे गैरसमज आढळून येत आहेत. रक्तदान हे जगात श्रेष्ठदान का म्हटल्या जाते, तर रक्तदानामुळे अनेक गरजू रुग्णांचे प्राण वाचविले जावू शकते.
रक्तदान ही एक सामाजिक बांधिलकी आहे. दर ३ महिन्याने प्रत्येक पात्र व्यक्तीच्या रक्तदानामुळे ९ रुग्णांना जीवनदान मिळते. अनेक मोठ्या शस्त्रक्रिया किंवा गंभीर परिस्थितीत रुग्णांचे प्राण वाचण्यास मदत होते. तसेच गरोदरपणात बाळाचे व आईचे प्राण वाचण्यास रक्तदान महत्वाचे कार्य करते. अपघातात झालेला अतिरिक्त रक्तस्त्राव, थॉलेसिमिया, रक्तक्षय, रक्ताचा कर्करोग, प्रसूतीपश्च्यात रक्तस्त्राव, शस्त्रक्रिया आणि इतर गंभीर आजारांमध्ये योग्यवेळी रुग्णाला रक्त मिळाले नाही, तर गरजू रुग्ण दगावण्याची शक्यता असते. अशावेळीच एखाद्या सम रक्तगटाच्या व्यक्तीने रुग्णासाठी रक्तदान करून प्राण वाचवू शकते.
रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ नये, यासाठी अधिकाधिक लोकांनी रक्तदान करणे गरजेच आहे. रक्तदान करण्यासाठी पात्रता प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. कारण रक्तदान ही जीव वाचविण्याची प्रक्रिया आहे आणि जीव वाचवणे नक्कीच सामान्य गोष्ट नाही! ही बाब नागरिकांच्या लक्षात आणून देऊन रक्तदान करण्यास प्रवृत्त करणे अत्यंत आवश्यक आहे.
स्वैच्छिक रक्तदानाबाबत सामाजिक कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी विविध उपक्रम, अभियान, जनजागृती कार्यक्रम राबवणे आवश्यक आहे. सोबतच स्वैच्छिक रक्तदानाविषयी नागरीकांमध्ये सामाजिक बांधिलकी, समाजहित, राष्ट्रीयतेची भावना, तरुण पिढीमध्ये रक्तदानाविषयी समाजातील गैरसमजांचा नायनाट, रक्तदानाविषयी मोठ्या प्रमाणात जनजागृती, सुदृढ मानसिक आरोग्य, स्वैच्छिक रक्तदानाबाबत समाजात सकारात्मक बदल घडवून आणणे हे अत्यंत महत्वाचे आहे.
यासाठी शासनाने- सेवाभावी संस्था, सांस्कृतिक मंडळे, लोक समित्या, विविध संघटना यांच्या माध्यमातून स्वैच्छिक रक्तदान शिबिरे आयोजित करणे अत्यंत महत्वाचे आहे.

देणाऱ्याने रक्तदान द्यावे…
करणाऱ्याने रक्तदान करण्यास प्रवृत्त करावे… आणि
मागणाऱ्याने स्वैच्छिक रक्तदान मागावे…
स्वैच्छिक रक्तदान ही सामाजिक ऋण जोपासणारी चळवळ बनली पाहिजे. यासाठी माझ्या सर्व तरुण वर्गाने स्वैच्छिक रक्तदानासाठी सरसावले पाहिजे व इतरांना रक्तदान करण्यास प्रवृत्त केले पाहिजे.

(अभिप्राय देण्यासाठी संपर्क करा, संपर्क ८०८०७५९७१८)
लेखक : आकाश प्रभाकर आंबोरकर
रा. खुर्सा पो. मुरमाडी ता. जिल्हा गडचिरोली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here