– उद्या सुविधा केंद्राचा उद्घाटन सोहळा
The गडविश्व
गडचिरोली, दि. २८ : गोंडवाना विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास साधण्यासाठी व विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी चिमूर येथे विद्यार्थी सुविधा केंद्र सुरू होणार आहे. २० जून रोजी गोंडवाना विद्यापीठात आमदार सुधाकर अडबाले यांनी घेतलेल्या सभेत याबाबत तात्काळ सुविधा केंद्र सुरू करावे, असे निर्देश दिले होते. त्यानुसार विद्यापीठाने दखल घेऊन उद्या २९ जून रोजी सुविधा केंद्राचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे.
गोंडवाना विद्यापीठांतर्गत चंद्रपूर जिल्ह्याच्या टोकावर असलेल्या व विद्यापीठापासुन लांब असलेल्या चिमूर तालुक्यातील आणि परिसरातील विद्यार्थ्यांच्या व महाविद्यालयाच्या सोयीकरिता विद्यापीठाचे सुविधा केंद्र चिमूर येथे स्थापन करावे, अशी गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स असोसिएशन व गोंडवाना विद्यापीठाच्या संबंधित असलेल्या इतर प्राध्यापक संघटना तसेच सिनेट सदस्यांच्या मागणीनुसार अधिसभेने मान्यता दिलेली होती. परंतु, दिड वर्ष उलटून ही विद्यापीठाने चिमूर येथे सुविधा केंद्र निर्माण न केल्याने २० जून २०२४ ला आमदार सुधाकर अडबाले यांनी गोंडवाना विद्यापीठात घेतलेल्या सभेत सुविधा केंद्र तात्काळ सुरू करण्याचे विद्यापीठास निर्देश दिले होते. त्यानंतर विद्यापीठाने यावर तात्काळ दखल घेत चिमूर येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालय चिमूर येथे सुविधा केंद्राची निर्मिती केली जाणार आहे. सुविधा केंद्राचा उद्घाटन सोहळा २९ जून रोजी दुपारी ४ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.
विद्यार्थी व शिक्षक हीत जोपासणारे नागपूर विभागाचे शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांच्या कार्यामुळे चिमूर परिसरातील विद्यार्थी, महाविद्यालयांना सुविधा केंद्राचा लाभ होईल. यामुळे आमदार अडबाले यांचे आभार मानण्यात येत आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolichimur #chimur #gondwana university)