-कोर्ला माल, कोर्ला चेक येथे बैठक
The गडविश्व
गडचिरोली, दि. ३० : जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या व सिरोंचा तालुका मुख्यालयापासून 75 किमी असलेल्या कोर्ला माल, कोर्ला चेक येथील अवैध दारूविक्री पुन्हा सुरु झाल्याची माहिती मिळताच मुक्तिपथ तर्फे दोन्ही गावातील महिलांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत दारूविक्री बंदीचा निर्णय घेऊन पुन्हा कोणी दारूविक्री करतांना आढळून आल्यास संबंधित विक्रेत्याकडून १० हजारांचा दंड वसूल करण्याचा निर्णय घेण्यात आला.
कोर्ला माल, कोर्ला चेक येथे मुक्तिपथ, गाव संघटना व ग्रामस्थांच्या पुढाकारातून विविध उपाययोजना करून अवैध दारूविक्री हद्दपार करण्यात आली होती. त्यामुळे गावात शांतता व सुव्यवस्था टिकून होती. परंतु, गावात दारूविक्रीबंदी लागू असतानाही गावात पाच नवीन दारूविक्रेत्यानी चोरट्या मार्गाने दारूविक्रीचा अवैध व्यवसाय सुरु केला होता. याबाबतची माहिती मिळतात गावामध्ये पुन्हा दारूबंदी लागू करण्याच्या उद्देशाने मुक्तिपथ तर्फे कोर्ला, कोर्ला चेक येथील दोन्ही गाव संघटनेच्या महिलांची विशेष सभा घेण्यात आली. यावेळी अवैध व्यवसाय पुन्हा बंद करण्यासाठी महिलांनी एकत्र यावे, या मुद्द्यावर मुक्तिपथ तालुका चमूने मार्गदर्शन करीत दारूविक्रीमुळे होणारे नुकसान महिलांच्या लक्षात आणून दिले. त्यानंतर ग्रामपंचायत सरपंच व सदस्य यांच्या उपस्थितीत अवैध दारूविक्री बंदीचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करीत विक्रेत्यांना नोटीस देण्याचे ठरवीत पुन्हा दारूविक्री केल्यास संबंधित विक्रेत्याकडून १० हजारांचा दंड देखील वसूल करण्याचे ठरविण्यात आले. त्यानंतर मुक्तीपथ तर्फे आयोजित मॅरेथॉन स्पर्धेच्या माध्यमातून महिला व युवतींनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवित दारूविक्रीविरुधात लढा देत आपल्या गावाला दारूच्या समस्येतून मुक्त करण्याचे महिलांनी ठरविले आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #muktipath )