-सीताटोला, चांदाळा , रानभूमी जंगलपरिसरात कृती
The गडविश्व
गडचिरोली, दि. १४ : गडचिरोली व धानोरा तालुका सीमेवर वसलेल्या काही गावातील विक्रेते अवैध दारूविक्री करीत असल्याने आसपासच्या गावांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. विक्रेत्यांनी सीताटोला, चांदाळा , रानभूमी जंगलपरिसरात मोहफुलाचा सडवा टाकला असल्याची माहिती मिळताच दोन्ही तालुक्यातील मुक्तिपथ तालुका चमू व गाव संघटनेने संयुक्त कृती करीत ३ लाख रुपये किमतीचा ३६ ड्रम मोहफुलाचा सडवा नष्ट केला.
गडचिरोली व धानोरा तालुका सीमेवर वसलेल्या सिताटोला, चांदाळा, रानभूमी येथील दारू विक्रेते जंगल परिसराचा आधार घेत हातभट्टी लावून मोहफुलाची दारू गाळतात. या गावातून जिल्हा मुख्यालयासह विविध गावांतील किरकोळ विक्रेत्यांना दारूचा पुरवठा केला जातो. आतापर्यंत मुक्तिपथ गाव संघटनेच्या माध्यमातून अनेकदा विक्रेत्यांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. तसेच पोलिस विभागाच्या माध्यमातून विक्रेत्यांवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. तरीसुद्धा गावातील काही विक्रेत्यांनी अवैध दारूविक्रीलाच आपला प्रमुख व्यवसाय बनविला आहे. संबंधित गावातील विक्रेत्यांमुळे आसपासच्या गावातील सुजाण नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. युवकांमध्ये दारू पिण्याचे प्रमाण देखील वाढत आहे. अशातच तालुका सीमेवरील जंगलपरिसरात ठिकठिकाणी हातभट्टी लावून दारू गाळली जात असल्याची माहिती मिळताच गाव संघटनेच्या माध्यमातून धानोरा व गडचिरोली मुक्तिपथ तालुका चमूने जंगलपरिसरात शोधमोहीम राबवून जवळपास ३ लाख रुपये किमतीचा ३६ ड्रम मोहफूलाचा सडवा व साहित्य नष्ट करून विक्रेत्यांना चांगलाच धडा शिकविण्यात आला आहे. या गावातील विक्रेत्यांवर पोलिस कारवाई करून गावाला दारूविक्रीमुक्त करण्याची मागणी आजूबाजूच्या गावातील नागरिकांतून केली जात आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #muktipath )