– दारूची सर्रासपणे विक्री
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा (चेतन गहाने) दि. १६ : गडचिरोली जिल्ह्यात कागदोपत्री दारूबंदी असली तरी प्रत्यक्षात मात्र चित्र वेगळे पहावयास मिळते. जिल्ह्यात अवैधरित्या दारूची सर्रासपणे विक्री केली जात असून कुरखेडा तालुक्यात दारू विक्रीचा महापूर पहावयास मिळत आहे. या दारू विक्रीला कोणाचा आशीर्वाद ? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
कुरखेडा तालुक्यातील अनेक गावे नक्षलग्रस्त भागात असून याचा फायदा घेत काही दारू विक्रेते अवैधरित्या दारूची विक्री करत असल्याचे समजते. तालुक्यातील पुराडा, मालेवाडा हे परिसर अतिदर्गम आहेत. त्याचबरोबर अनेक गावे जांगलाशेजारी आहेत. तालुक्यातील अनेक गावात अवैधरीत्या दारू विक्री केली जाते. दारू तस्कर हे अंधाराचा फायदा घेत रात्रोच्या सुमारास जेमतेम १२ वाजताच्या नंतर दारू पुरवठा करीत असतात. तालुका मुख्यालयापासून काही अंतरावर दारू विक्री केली जात आहे मात्र याकडे पोलीस प्रशासनाच्या नजरा भिरकल्या नसेल काय ? पोलिसांना याचा ठाव ठिकाणा नाही काय ? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. तालुक्याच्या जवळपास पोलीस मदत केंद्र, पोलीस स्टेशन उभारले आहेत असे असताना मालेवाडा, पुराडा परिसरात अवैधरीत्या दारूची विक्री केली जात आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचे दिसून येत आहे. खुलेआम दारू विक्री केली जात असताना दारू विक्रेते मुजोरी करतानाचे दिसत आहे त्यामुळे त्यांच्यावर पोलिसांचा धाक राहिलेला नाही असेही नागरिकांत चर्चा होताना दिसते. तर एखाद्याची तक्रार पोलिसात देऊ म्हंटले तेही या मुजोर दारू विक्रेत्यामुळे देऊ शकत नाही असेही चित्र आहे. दारुविक्रेत्यांचे पोलिसांशी साटेलोटे आहे त्यामुळे तक्रार करूनही काही फायदा होणार नाही, उलट आपण संकटात पडू अशा चर्चाही दबक्या आवाजात ऐकायला मिळत असतात. अवैध दारू विक्रीने अनेक युवा वर्ग दारूच्या आहारी जात असल्याचे चित्र असून दारू पिऊन सुसाट वाहन चालविण्याचे प्रकारही दिसत आहे. तर आठवड्यापूर्वी तालुक्यातील चारभट्टी येथील एक व्यक्ती दारूमुळे दुचाकीने झाडाला धडक देऊन ठार झाला तर काल मौशी येथील एक जवान युवक दारूच्या नशेत दुचाकीने पडल्याची घटना ताजी आहे.
एकूणच गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असताना जिल्ह्यात दारूचा महापूर पहावयास मिळत असून अनेकजण याच्या आहारी जात असल्याचे चित्र आहे. दारूबंदी जिल्ह्यात खुलेआम दारू विक्री होत असताना या दरुविक्रिला पाठबळ कुणाचे असा सवालही उपस्थित होत आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #kurkheda )