विक्रेत्यांना धडा शिकवून गावाला केले अवैध दारूविक्रीमुक्त

150

– सात वर्षांपासून दारुबंदी
The गडविश्व
गडचिरोली, दि. २८ : कोरची तालुक्यातील घुगवा या गावाला दारूच्या समस्येतून मुक्त करण्यासाठी ग्रामपंचायत, मुक्तीपथ गाव संघटना, गावातील पदाधिकारी व युवकांनी संयुक्त प्रयत्न करीत दारू विक्रेत्यांना धडा शिकवला. आता सलग सात वर्षांपासून हे गाव दारूविक्री मुक्त गाव म्हणून नावारूपास आले आहे.
गावात अवैध दारूविक्री सुरू असल्याने अनेक समस्यांचा सामना गावातील लोकांना करावे लागत होते. दारूविरोधात मुक्तीपथ व गाव संघटनेच्या माध्यमातून विवीध उपक्रम राबवून ग्रामस्थांना जागृत केले जात होते. अशातच पेसा ग्रामसभेमध्ये संपूर्ण ग्रामस्थांच्या उपस्थितीत आपल्या गावातून अवैध दारूविक्रीला हद्दपार करण्याच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली व सर्वानुमते दारुबंदीचा ठराव पारित करण्यात आला. तसेच दारूविक्री करताना आढळून आल्यास संबंधित व्यक्तीकडून 20 हजारांचा दंड देखील वसूल करण्याचे ठरविण्यात आले. गावातील प्रतिष्ठीत नागरीक रामेश्वर राउत यांनी दारूबंदीचे महत्व पटवून दिले. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी मुक्तीपथ गाव संघटना पुनर्गठित करून अध्यक्ष म्हणून भुषन दमगरा यांची निवड करण्यात आली. सभेत पोलीस पाटील मुकेश जुर्री , तंटामुक्त समीती अध्यक्ष, पेसा ग्राम सभा अध्यक्ष, सचिव, बचत गट महीला अध्यक्ष, सचिव, आशा, शिक्षक वृंद, ग्रा,पं,सदस्य यांचा सक्रीय सहभाग होता.
गाव संघटनेच्या माध्यमातून गावातील अवैध दारूविक्री बंदीसाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. निर्णयाचे उल्लंघन करून एक विक्रेता दारू विक्री करीत असल्याची माहिती मिळताच गावातील महिलांनी अहिंसक कृती करीत दारू जप्त केली. त्यांनतर गावाच्या निर्णयानुसार संबंधित विक्रेत्याकडून 20 हजारांचा दंड वसूल करण्यात आला.
तसेच 2019 मध्ये पोळ्याच्या सणाच्या दिवशी युवकांनी गावातील रस्त्याहून इतर गावाकडे दारूची वाहतूक करणाऱ्यास पकडून दारुसह पोलिसांच्या स्वाधीन केले व गुन्हा दाखल करण्यात आला. गावाची दारुबंदी टिकवून ठेवण्यासाठी नियोजनबद्ध कारभार ग्रामस्थांच्या माध्यमातून सुरू आहे. त्यामुळे सलग सात वर्षांपासून हे गाव अवैध दारूविक्रीमुक्त गाव ठरले आहे. गावात व्यसनाचे प्रमाण सुद्धा कमी असून मुक्तीपथ गाव संघटनेच्या माध्यमातून विविध कृती कार्यक्रम राबविले जात आहेत. रुग्णांसाठी दोनदा व्यसन उपचार शिबीर देखील आयोजित करण्यात आले होते.काही दिवसातच गावात दारूबंदीचा विजयस्तंभ उभारण्यात येणार आहे. यासाठी मुक्तीपथ तालुका संघटीका निळा किन्नाके, उपसंघटक अमीर पठाण, तालुका प्रेरक चंद्रशेखर अंबादे हे ग्रामस्थांना मार्गदर्शन करीत आहेत.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #muktipath )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here