‘सारथी मोडीलिपी’ प्रशिक्षणासाठी मराठा, कुणबी विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

173

The गडविश्व
गडचिरोली दि.०१ : छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुणे च्या वतीने मराठा-कुणबी लक्षित गटातील विद्यार्थ्यांकरिता “सरसेनापती हंबीरराव मोहिते सारथी मोडीलिपी प्रशिक्षण प्रकल्प” 2024-25 योजनेच्या लाभासाठी पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना विद्यावेतनही देण्यात येणार आहे.
या प्रशिक्षणांतर्गत सारथी पुणे विभागीय कार्यालयामार्फत 12वी उत्तीर्ण 20 विद्यार्थ्यांना सावित्रिबाई फुले पुणे विद्यापीठातील मोडीलिपी प्रशिक्षण संस्थेद्वारे 60 तास (2 महिने) ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासोबतच सारथीच्या कोल्हापूर उपकेंद्रामार्फत कुठल्याही शाखेतील पदवीधर 50 विद्यार्थ्यांना शिवाजी विद्यापतीठातील छत्रपती शाहु महाराज मराठा इतिहास अध्ययन केंद्राद्वारे 6 महिने प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर विभागीय कार्यालयामार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संभाजीनगर येथील मोडीलिपी प्रशिक्षण संस्थेद्वारे कुठल्याही शाखेतील पदवीधर 40 विद्यार्थ्यांना 1 वर्ष कालावधीसाठी मोडीलिपी सर्टिफिकेट कोर्सचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

पात्रता व विद्यावेतन

पुणे, कोल्हापूर व संभाजीनगर विद्यापीठ व जिल्हा मुख्यालयाच्या बाहेरील कागदपत्रांच्या छाणनीद्वारे अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना प्रति विद्यार्थी दरमहा 10 हजार रुपये विद्यावेतन देण्यात येणार आहे. उमेदवारांस पूर्वलक्षी प्रभावाने आर्थिक सहाय्य अनुज्ञेय राहणार नाही.

या मोडीलिपी प्रशिक्षणाबाबतची संपूर्ण माहिती, मार्गदर्शक तत्वे, ऑनलाईन अर्ज, अर्ज भरण्याकरिता सूचना व हार्ड कॉपी सादर करण्याचा पत्ता आदींबाबत https://sarthi-maharashtra.gov.in या संकेतस्थळावर लिंक 15 ऑगष्ट 2024 पर्यंत उपलब्ध राहील. विभागीय कार्यालयास हार्ड कॉपी सादर करण्याची अंतिम मुदत 20 ऑगष्ट 2024 आहे. या तारखेमध्ये बदल असल्यास सारथीच्या संकेतस्थळावर सूचित करण्यात येणार आहे.

जास्तीत-जास्त लक्षित गटातील विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सारथी नागपूरचे उपव्यवस्थापकीय संचालक सुरेश बगळे यांनी केले आहे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here