-भीमपूर येथे दारूबंदीसाठी बैठक
The गडविश्व
गडचिरोली, दि. १३ : कोरची तालुक्यातील भीमपूर येथील अवैध दारूविक्री थांबविण्यासाठी मुक्तिपथ व गाव संघटनेच्या संयुक्त विद्यमाने प्रयत्न केले जात आहेत. गावातील विक्रेत्यांविरोधात अहिंसक कृती करूनही त्यांनी आपला अवैध व्यवसाय बंद केला नाही. त्यामुळे पोलिसांच्या उपस्थितीत आयोजित बैठकीत विक्रेत्यांना बोलावून पुन्हा अवैध दारूविक्रीचा व्यवसाय बंद न केल्यास कायदेशीर कारवाई व दंड वसूल करण्याचे ठणकावून सांगण्यात आले.
भीमपूर या गावातील अवैध दारूविक्री बंदीसाठी गाव संघटनेच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात आल्या. परंतु गावातील चार विक्रेत्यांनी आपला अवैध व्यवसाय सुरूच ठेवला. त्यामुळे गावामध्ये पोलीस पाटील यांच्या प्रयत्नातून संघटनेचे अध्यक्ष राधेशाम दरवडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी पोलीस विभागाचे हवालदार अशोक घाटघुमार, पोलीस शिपाई शिवचरण भालेराव, मुक्तीपथ तालुका संघटक निळा किन्नाके यांच्या उपस्थितीत गावातील चार दारू विक्रेत्यांना बोलावून अवैध व्यवसाय बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या. पोलिस कर्मचाऱ्यांनी संबंधित विक्रेत्यांना अवैध दारूविक्रीविरोधात विविध कायदे सांगितले. तसेच तत्काळ अवैध व्यवसाय बंद न केल्यास पोलिस कारवाईसह दंडात्मक कारवाई करण्याचे ठणकावून सांगण्यात आले. यावेळी विक्रेत्यांनी आपण दारूविक्रीचा धंदा बंद करण्याची ग्वाही सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत दिली.
यावेळी ग्रा,पं,सदस्य मेहरसिंग काटेंगे, ग्रा,पं,सदस्य चरण उंदिरवाडे, माजी उपसरपंच गौतम चौधरी, प्रमीला काटेंगे, प्रल्हाद चांग, कैलास अंबादे, शामराव अंबादे, दयाराम चांग यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #gadchirolilocalnews )