The गडविश्व
गडचिरोली, दि. ३१ : चामोर्शी तालुक्यातील सगणापूर हे गाव मुख्यालयापासून १५ किमी अंतरावर आहे. सदर गावाची येणापूर क्षेत्रात दारूविक्रीसाठी प्रसिद्ध गाव म्हणून ओळख होती. परंतु, गावातील तंमुस समिती, मुक्तिपथ गाव संघटना, युवकांच्या पुढाकारातून या गावाने अवैध दारूवर बंदी घातली आहे. या निर्णयामुळे महिलांचे संसार आनंदाने सुरु असून गाव विकासाकडे वाटचाल करीत आहे. विशेष म्हणजे, ग्रामस्थांनी केलेल्या दारूबंदीमुळे परिसरातील इतरही गावे सगणापुर गावाचे गुणगान गात आहेत.
पूर्वी अवैध दारूविक्री सुरु होती तेव्हा सगणापुर गावाच्या शेजारी गावातील मद्यपी दारू पिण्यासाठी येत होते. गावात अवैध दारूविक्री करणे व परिसरातील इतर विक्रेत्यांना पुरवठा करण्याचे काम सुरु होते. साधारणतः या गावाची लोकसंख्या ६२० आहे. हे गाव पेसा अंतर्गत असून गावातील दारूबंदी करण्याचे अधिकार गावालाच आहेत. परंतु, संपूर्ण गाव दारूच्या विळख्यात अडकल्यामुळे त्यातून कसे बाहेर निघावे, हा मार्ग बंद झाला होता. सायंकाळची वेळ झाली असता गावागावातील व्यक्ती तसेच बाहेर गावातील दारू शौकीन या गावामध्ये येऊन आपला शौक पूर्ण करीत होते. महिलांना जीवन जगणे कठीण झाले होते. रोजगारातून मिळालेल्या तुटपुंज्या मजुरीतून मुलांचे शिक्षण व उदरनिर्वाह करणे कठीण झाले होते. अशी एकंदरीत गावाची वाईट स्थिती झाली होती. अशातच तंटामुक्ती समिती गठीत झाली. त्यातील काही युवक व मुक्तिपथ गाव संघटनेच्या महिलांनी एकत्र येऊन अवैध दारूविक्री थांबविण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्णय केला. त्यानुसार मुक्तिपथ, पोलिस विभाग, महिला संघटन, समिती व ग्रामपंचायत पदाधिकारी, युवा मंडळ यांनी सूचना काढून २५ एप्रिल २०२३ रोजी सभेचे आयोजन केले. सदर सभेत दारू व तंबाखूच्या व्यसनाचे गांभीर्य , दुष्परिणाम, सामाजिक दर्जा व शासकीय कायदा यासंदर्भात चर्चा करून मुक्तिपथ प्रतिनिधींनी विविध मुद्दे ग्रामस्थांपुढे मांडले. या सभेत दारू विक्रेत्यांना समस, केवळ दारूचं नव्हे तर तंबाखू सुद्धा बंदी करण्याचे एक मताने निर्णय झाला.
या निर्णयाची अंबलबजावणी करीत वर्षभरापासून अवैध दारूविक्री बंद आहे. यासाठी पोलिस विभाग आणि ग्राम पंचायत समिती सदस्य यांचा सक्रिय सहभाग होता. गावाला दारूच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी सरपंच स्वाती टेकाम, तंमुस अधक्ष मंगलदास, पेसा अध्यक्ष प्रभाकर मेश्राम, आष्टीचे पोलिस, मुक्तिपथ गाव संघटना अध्यक्ष सोयाम, मुक्तिपथचे आनंद इंगळे व आनंद सिडाम यांचे मोलाचे योगदान आहे. सदर गावातील निर्णयाची व कार्याची परिसरातील इतर गावांकडून कौतुक केले जात आहे. सध्यस्थितीत या गावात सामाजिक उपक्रम होत आहेत. विशेष म्हणजे महिलांचा संसार सुखाने सुरु आहे. गाव विकासाकडे वाटचाल करीत आहेत.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #gadchirolilocalnews #muktipath )