The गडविश्व
गडचिरोली, दि. ११ : तालुक्यातील बाम्हणी, भगवानपूर, मोहडोंगरी येथील महिलांनी तिन्ही गावात सुरू असलेल्या अवैध दारू विक्री विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी गडचिरोली पोलीस स्टेशन गाठून आमच्या गावातील अवैद्य दारू विक्री बंद करण्याची मागणी केली.
बाम्हणी ग्रामपंचायत अंतर्गत मोहडोंगरी, बाम्हणी व भगवानपूर या गावांमध्ये सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीमुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. या तिन्ही गावांमध्ये दारू विक्री होत असल्याने परिसरातील गावांना देखील याचा त्रास सहन करावा लागत आहे. गावांमध्ये व्यसनाचे प्रमाण वाढत असल्याने गावातील दारू विक्री थांबविण्यासाठी मुक्तीपथ गाव संघटन विशेष परिश्रम घेत आहे. गावातील महिलांनी अहिंसक कृतीच्या माध्यमातून दारू विक्रेत्यांचा मोहफुलाचा सडवा व साहित्य नष्ट करून अवैध धंदा बंद करण्याची सूचना केली. तसेच आतापर्यंत पोलीस विभागाच्या माध्यमातून दारू विक्रेत्यांवर कारवाई देखील करण्यात आली आहे. तरीसुद्धा संबंधित गावातील काही मुजोर दारू विक्रेत्यांनी आपला अवैध व्यवसाय सुरूच ठेवला आहे. ही गंभीर समस्या लक्षात घेता तिन्ही गावातील लोकांनी आपल्या गावात दारू विक्री बंदीचा निर्णय घेतला. त्यानंतर महिलांनी गडचिरोली पोलीस स्टेशन गाठून निवेदन सादर केले. या निवेदनातून आपल्या गावात अवैध दारू विक्रीमुळे निर्माण होणाऱ्या समस्या मांडल्या सोबतच गावातील विक्रेत्यांवर कारवाई करून आमचे गाव दारू मुक्त करण्यासाठी सहकार्य करण्याची मागणी केली.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #muktipath )