महिला शक्ती आक्रमक ; ८ दिवसात ४ विक्रेत्यांवर गुन्हा दाखल

92

महिला शक्ती आक्रमक ; ८ दिवसात ४ विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
– ४५ लिटर मोहफुल व देशी दारु जप्त
The गडविश्व
गडचिरोली, दि. १३ : चामोर्शी तालुक्यातील तळोधी मोकासा या गावाला अवैध दारूविक्रीमुक्त करण्यासाठी महिलांनी शर्तीचे प्रयत्न सुरु केले आहे. त्यामुळे मागील तीन महिने गावातून अवैध दारू हद्दपार झाली होती. परंतु, गावातील काही विक्रेत्यांनी चोरट्या मार्गाने अवैध व्यवसाय सुरु केल्याची माहिती मिळताच मुक्तिपथ व गाव संघटनेच्या महिलांनी अहिंसक कृती करीत मागील आठ दिवसात ४५ लिटर मोहफुल व देशी दारू जप्त करीत चार दारुविक्रेत्याना पोलिसांच्या स्वाधीन केले.
तळोधी मोकासा हे गाव मुख्यालयापासून १० किमी अंतरावर आहे. या ठिकाणी १५ ते २० दारू विक्रेते सर्रास दारू विक्री करीत होते. अवैध दारूविक्रीला कंटाळून महिलांनी ग्रामसभा घेऊन दारूविक्रीबंदीचा ठराव पारित केला. तसेच सर्व दारूविक्रेत्यांना नोटीस देऊन अवैध व्यवसाय तत्काळ बंद करण्याची तंबी देण्यात आली. यामुळे काही दारू विक्रेत्यांनी दारूविक्री बंद केली. परंतु काही मुजोर विक्रेत्यांनी आपला अवैध व्यवसाय सुरूच ठेवला. त्यामुळे गाव संघटनेने सात दारूविक्रेत्यांना पडकून पोलिसांच्या स्वाधीन केले. तरी काही विक्रेत्यांनी आपला व्यवसाय सुरूच ठेवला. यासंदर्भातील माहिती पोलिस अधीक्षक यांना निवेदनातून देण्यात आली असता संबंधित विक्रेत्यांवर सुद्धा कारवाई करण्यात आली. यामुळे सदर गाव गेल्या तीन महिन्यांपासून अवैध दारूविक्रीमुक्त झाला होता. त्यानंतरही एका होलसेल विक्रेत्यासह इतर विक्रेत्यांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, गावातील महिला शेती कामात व्यस्त झाल्याचे बघून काही विक्रेत्यांनी पुन्हा आपले डोके वर काढीत दारूविक्री सुरू केली. ही बाब लक्षात येताच आयोजित बैठकीत मुक्तिपथचे तालुका उपसंघटक आनंद सिडाम यांनी दारू विक्रेत्यांवर योग्य वेळीच कारवाई न केल्यास सर्व विक्रेते पुन्हा आपला अवैध व्यवसाय सुरु करण्याची शक्यता असल्याची बाब पटवून दिली. त्यानंतर गावातील मुक्तीपथ व शक्तीपथ या दोन्ही संघटनेच्या महिलांनी दारूविक्रेत्यांविरोधात अहिंसक कृती करण्याचे नियोजन केले. त्यानुसार मागील आठ दिवसांपासून कृती करीत गावातील विक्रेत्यांविरोधात मोहीम हाती घेत 45 लिटर मोहफुल व 35 देशी टिल्लू पकडुन पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी पंचनामा करून गुरू गोसाई गेडाम, विशाल बुधा भांडेकर, दिवाकर तुळशीराम भोयर व सुंदरा काशिनाथ शेरकी या चार दारू विक्रेत्यांवर गुन्हा दाखल केला. या कारवाईमुळे विक्रेत्यांचे धाबे दणाणले असून पुन्हा आपल्या गावाला अवैध दारूविक्रीमुक्त करण्यासाठी महिला संघटना सरसावल्या आहेत.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #muktipath )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here