– विहित मुदतीत काम पूर्ण करण्याचे निर्देश
The गडविश्व
चंद्रपूर : जिल्ह्यातील रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची नव्हे तर गुणवत्तापूर्वक करून सदर कामे विहित मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे सभागृहात आयोजित हायब्रीड ॲन्युटी रस्त्यांच्या संदर्भात आढावा बैठक पार पडली, यावेळी ते बोलत होते.
बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता सुषमा साखरवाडे, कार्यकारी अभियंता हेमंत कोठारी, कुंभे, भास्करवार तसेच सिंदेवाहीचे कार्यकारी अभियंता माधवराव गावड प्रामुख्याने उपस्थित होते.
रस्त्यांचे उत्कृष्ट दर्जाचे काम जिल्ह्यात व्हायला हवे, असे सांगून पालकमंत्रीविजय वडेट्टीवार म्हणाले, जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामात गुणवत्ता राहावी यासाठी अधिकाऱ्यांनी आठवड्यातून एकदा रस्त्यांच्या कामांना भेटी द्याव्यात. रस्त्याच्या कामाची गुणवत्ता सार्वजनिक बांधकाम विभागाने तपासून घ्यावी. बोगस काम करणाऱ्या कंत्राटदारास थारा देता कामा नये. तपासणीअंती निकृष्ट दर्जाचे काम आढळल्यास संबंधित कंपनीवर नियमानुसार कारवाई करावी, असे निर्देश पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले.
ते पुढे म्हणाले, संबंधित कंपन्यांनी जिल्ह्यातील सर्व रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करून कालमर्यादा पाळावी. कामे करीत असतांना सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित कंपन्यांवर व कंत्राटदारावर अंकुश ठेवावा. रस्त्यांच्या कामांमध्ये दर्जा असावा. काही रस्त्यांवर अल्प कालावधीतच खड्डे पडले आहेत. रस्त्यांच्या खराब अवस्थेमुळे नागरिकांची गैरसोय होत असते. काही नागरिकांना खराब रस्त्यामुळे जीव सुद्धा गमवावे लागले. यापुढे बोगस काम करणाऱ्या कंत्राटदारावर व कंपन्यांवर कारवाई करणार असल्याचेही ते म्हणाले.
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता सुषमा साखरवाडे यांनी जिल्ह्यातील रस्त्याच्या बांधकामासंदर्भात सविस्तर माहिती दिली.