पेसा क्षेत्रातील पदभरतीची गुणवत्ता यादी जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध

2809

– उमेदवारांनी दस्तावेज पडताळणीसाठी वेळापत्रकानुसार उपस्थित राहण्याचे सीईओ आयुषी सिंह यांचे आवाहन
The गडविश्व
गडचिरोली दि. ५ : अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) १७ संवर्गातील सरळसेवेच्या पदांबाबत जाहिरातीनुसार सुरू झालेल्या भरती प्रक्रिया उमेदवार निवडीच्या अंतिम टप्प्यापर्यंत येऊन पोहचल्या होत्या. काही विभागांनी निवड प्रक्रियेचा अंतिम निकाल जाहिर केला होता, तर काही विभागांमार्फत निवडप्रक्रियेचा निकाल तयार झाला होता, परंतू जाहिर झाला नव्हता. पेसा क्षेत्रातील पदे १ वर्षापासून रिक्त असल्याने सदर पदे तातडीने भरण्यासाठी जिल्हा परिषदे अंतर्गत अनुसुचित क्षेत्रातील (पेसा) अधिसुचित संवर्गातील पदांकरिता निवड प्रक्रियेव्दारे पात्र ठरलेल्या उमेदवारांमधुन विशेष बाब म्हणून मानधन तत्त्वावर नियुक्त करण्यास संवर्गनिहाय संबंधित प्रशासकिय विभागांना शासन निर्णयान्वये परवानगी देण्यात आलेली आहे. पदभरती संदर्भाने सामान्य प्रशासन विभागाने ०५ ऑक्टोबर २०२४ रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयात नमुद केल्याप्रमाणे कार्यवाही करुन अनुपालन अहवाल ०८ ऑक्टोबर २०२४ पर्यंत शासनास सादर करायचे आहे.
त्याकरीता आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (महिला), कंत्राटी ग्रामसेवक, पशुधन पर्यवेक्षक व अंगणवाडी पर्यवेक्षिका यांची गुणवत्तेनुसार दस्ताऐवज पडताळणी तातडीने करण्यात येत असल्याने गुणवत्ता यादी व दस्ताऐवज पडताळणीचे वेळापत्रक जिल्हा परिषद, गडचिरोलीचे संकेतस्थळ www.zpgadchiroli.in येथे प्रसिध्द करण्यात येणार आहे. विभागांनी प्रसिध्द केलेल्या गुणवत्ता यादीचे व वेळापत्रकाचे जिल्हा परिषद, गडचिरोलीच्या संकेतस्थळावर भेट देऊन पाहणी करावी व त्यानुसार दस्ताऐवज पडताळणी करीता सहकार्य करुन आवश्यक दस्ताऐवजासह पडताळणीस उमेदवारांनी हजर रहावे. अनुपस्थित राहील्यास आपणास पुनश्च संधी देता येणार नाही, असे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here