The गडविश्व
गडचिरोली, दि. २४ : रानटी हत्ती परिसरात आल्याने त्यासोबत सेल्फी काढण्याचा नाद एका मजुराच्या जीवावर बेतला. रानटी टस्कर हत्तीने हल्ला करीत मजुराला चिरडून जागीच ठार केल्याची घटना गुरुवार २४ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास चामोर्शी तालुक्यातील आबापूर जंगलामध्ये घडली. श्रीकांत रामचंद्र सतरे, रा. नवेगाव ( भु), ता. मूल, जि. चंद्रपूर असे ठार झालेल्या मजुराचे नाव आहे.
गडचिरोली जिल्ह्यात मागील दोन वर्षापूर्वी ओडिशा राज्यातून रानटी हत्तीचा कळप दाखल झाला. जिल्ह्यातील विवध भागात कळपाने मार्गक्रमण करीत शेतपिकांची नासाडी केली तर विविध घटनेत नागरिकांचा हत्तीच्या हल्यात मृत्यू झाला.
श्रीकांत सतरे हा आपल्या काही सोबत्यांसह गडचिरोली जिल्ह्यात केबल टाकण्याचे काम करण्याकरिता आला होता. दरम्यान गडचिरोली वनविभागातील कुनघाडा रै. वन परिक्षेत्रांतर्गत आबापूर गाव परिसरातच काम सुरू होते. २३ ऑक्टोबर रोजी चातगाव व गडचिरोली वन परिक्षेत्रातून रानटी टस्कर हत्तीने कुनघाडा रै. वन परिक्षेत्रात प्रवेश केलेला होता.नियत क्षेत्र मुतनूर वनक्षेत्रातील आबापूर जंगलात टस्कर हत्ती वावरत असल्याची माहिती केबल टाकणाऱ्या मजुरांना मिळाली असता तिघेजण हत्ती पाहायला गुरुवारी सकाळीच गेले होते. हत्ती दूरवर असताना श्रीकांत हा हत्तीसोबत सेल्फी काढण्यात मग्न असताना हत्तीने हल्ला करून त्याला चिरडले. घटनेच्या वेळी अन्य दोघांनी तेथून पळ काढत आपला जीव कसाबसा वाचविला. जिल्ह्यात आणखी एकाचा रानटी हत्तीच्या हल्यात मृत्यू झाल्याने खळबळ उडाली असून रानटी हत्तीच्या जवळ जावू नये, सेल्फी च नाद करू नये, हत्ती असलेल्या परिसरात प्रवेश करू नये अशा सूचना वारंवार वनविभागामार्फत देण्यात येत आहेत. तरी मात्र काही नागरिक हत्तींना बघण्याकरिता जंगल परिसरात जात असल्याने अशा घटना समोर येत आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #wildelephant #forest)