The गडविश्व
गडचिरोली, दि. ०३ : जिल्ह्याच्या उत्तर टोकावर वसलेल्या कोरची तालुक्यातील मुख्य ठिकाण असलेल्या कोटगुल येथील जि.प शाळेत मुक्तिपथ तर्फे शाळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना हसत-खेळत तंबाखूमुक्तीचे धडे देण्यात आले.
शाळा, कॉलेज, बाजार परिसरात सहजतेने उपलब्ध होणाऱ्या सिगारेट, तंबाखूजन्य पदार्थ आणि त्याच्या खुलेआम जाहिरातीमुळे विद्यार्थी आणि तरुणांमध्ये सिगारेट व तंबाखू सेवनांचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यावर नियंत्रण मिळविणे गरजेचे आहे. शालेय विद्यार्थ्यांना तंबाखूच्या व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी मुक्तिपथ तर्फे शाळा व महाविद्यालयांमध्ये शाळा कार्यक्रम हा उपक्रम घेऊन विद्यार्थ्यांना जागृत केले जात आहे. कोटगुल येथील जिप उच्च प्राथमिक शाळॆत आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांना विविध खेळ, गीतांसह अनेक उपक्रमातून तंबाखूचे दुष्परिणाम पटवून देण्यात आले. विद्यार्थ्यांनी पालकांचा खर्रा-तंबाखू घेऊन आणायचा नाही, खर्रा-तंबाखूचे सेवन करीत असलेल्या वर्गमित्रांना या व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी प्रोत्साहित करावे. आपल्या राज्यात तंबाखूबंदी असून यासाठी शासनाने विविध कायदे अमलात आणले आहेत. त्या कायद्याबाबतची माहिती सुद्धा विद्यार्थ्यांना देण्यात आली. यावेळी मुख्याध्यापीका पि.एम.उराडे, तालुका संघटक निळा किन्नाके, स्पार्क कार्यकर्ता भुषन डोकरमारे यांनी विद्यार्थ्यांना तंबाखूच्या दुष्परिणामांची विस्तृत माहिती देत व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन केले.