The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि. ०६ : दरवर्षी धान खरेदी केंद्र दिवाळीला सुरू होते परंतु यावर्षी हे खरेदी केंद्र डिसेंबर महिना लागून सुद्धा सुरू झाले नाही त्यामुळे मुरूमगाव परिसरातील शेतकऱ्यांना अतिशय कमी भावाने आपले धान व्यापाऱ्यांना विकावे लागत असून शेतकरी धान खरेदी केंद्र सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत.
धानोरा तालुक्यातील मुरूमगाव परिसर विस्ताराने मोठा असून या परिसराला लागून जवळपास १७ ते २० गाव आहेत. या भागात सिंचनाची सुविधा नसतानाही धान पिकाची शेती असून या परिसरात हलक्या – मध्यम आणि जड प्रतीच्या धानाची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. या भागातील शेतकऱ्यांनी धानाची कापणी व बांधणी केली आणि पारंपारिक पद्धतीने मळणी केली त्यामुळे मुरूमगाव येथील धान खरेदी केंद्र लवकरात लवकर सुरू करावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
मुरुमगाव येथे आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने धान खरेदी केंद्रासाठी गोदाम उपलब्ध असून राज्य शासनाच्या एकाधिकार योजनेअंतर्गत धानाची खरेदी करण्यास विलंब का होत आहे असा आर्त प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. आधीच निसर्गाने दगा दिल्याने शेतकऱ्यावर टांगती तलवार उभी होती, मात्र शेतकऱ्यांनी परिश्रम घेऊन धानाचे उत्पादन केले आहे. आता धान खरेदी केंद्र कधी सुरू होनार याच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत.