– २४ तासात उभारले नवीन पोलीस मदत केंद्र
The गडविश्व
गडचिरोली, दि. ११ : जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील उपविभाग भामरागड अंतर्गत पेनगुंडा येथे एका पोलीस मदत केंद्राची स्थापना केली. सदर मदत केंद्र हे गडचिरोली पोलिस दलाने १ हजार सी-६० कमांडो, २५ बीडीडीएस टीम, नवनियुक्त पोलीस जवान, ५०० विशेष पोलीस अधिकारी व खाजगी कंत्राटदार यांच्या मदतीने २४ तासात उभारले.
नवीन पोलीस मदत केंद्राचे उद्घाटन विशेष पोलीस महानिरीक्षक, पश्चिम क्षेत्र, सिआरपीएफचे टी. विक्रम, विशेष पोलीस महानिरिक्षक (नक्षलविरोधी अभियान) संदिप पाटील, पोलीस उपमहानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र अंकित गोयल, पोलीस अधीक्षक नीलोत्पल, ११३ बटा. सिआरपीएफचे कमांडण्ट जसवीर सिंग व ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडले.
पेनगुंडा गावातील ग्रामस्थांनी नुकतीच माओवाद्यांना गावबंदी केली आहे. नवीन पोलीस मदत केंद्राची स्थापना या भागाच्या सर्वांगीण विकासामध्ये महत्वाची भूमिका बजावेल असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी केले. गर्देवाडा नंतर या वर्षातील अति-दुर्गम भागातील हे दुसरे नवीन पोलीस मदत केंद्र आहे.
माओवाददृष्ट्या अतिसंवेदनशील गडचिरोली जिल्हा, दुर्गम-अतिदुर्गम भाग असलेला ज्या ठिकाणी बरेच आदिवासी बांधव आज देखील विकासापासून कोसो दूर आहेत, त्यांचा विकास साधावा व माओवाद्यांच्या कारवायांना आळा बसावा यासाठी गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने आज ११ डिसेंबर २०२४ रोजी उपविभाग भामरागड अंतर्गत पेनगुंडा या ठिकाणी नवीन पोलीस मदत केंद्राची स्थापना करण्यात आली. भामरागड पासून १५ किमी., धोडराज पासुन १० किमी. व छत्तीसगड सिमेपासुन फक्त ०३ किमी. अंतरावर असलेल्या अति-दुर्गम पेनगुंडा व आसपासच्या गावातील नागरिकांच्या सुरक्षा व सर्वांगीण विकासाला हातभार लागून त्यांनी विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्याकरीता पोलीस मदत केंद्र पेनगुंडा मैलाचा दगड ठरेल. सदर पोलीस मदत केंद्राची उभारणी करण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. त्यात एकुण १०५० मनुष्यबळ, १० जेसीबी, १० ट्रेलर, ०४ पोकलेन, ४५ ट्रक इत्यादीच्या सहाय्याने अवघ्या एका दिवसांत पोलीस मदत केंद्राची उभारणी करण्यात आली. सदर पोलीस मदत केंद्रामध्ये पोलीस बलाच्या सुविधेसाठी वायफाय सुविधा, २० पोर्टा कॅबिन, जनरेटर शेड, पिण्याच्या पाण्यासाठी आर ओ प्लँट, मोबाईल टॉवर, टॉयलेट सुविधा, पोस्ट सुरक्षेसाठी मॅक वॉल, बी.पी मोर्चा, ०८ सँन्ड मोर्चा इत्यादींची उभारणी करण्यात येत असून यासोबतच पोलीस मदत केंद्राच्या सुरक्षेसाठी गडचिरोली पोलीस दलाचे ०४ अधिकारी व ४५ अंमलदार, एसआरपीएफ ग्रुप १४, छत्रपती संभाजी नगरचे ०२ प्लाटुन तसेच सिआरपीएफ ११३ बटा. सी कंपणीचे ०१ असिस्टंट कमांडन्ट व ७० अंमलदार, विशेष अभियान पथकाचे ०६ पथक (150 कमांडोज) तैनात करण्यात आले आहेत. तसेच पोमकें उभारणी कार्यक्रमादरम्यान पोलीस मदत केंद्र पेनगुंडा हद्दीतील उपस्थित नागरिकांपैकी महिलांना नववारी साडी, स्वयंपाकाचे मोठे भांडे, पुरुषांना घमेले, ताडपत्री, स्प्रे-पंप, युवकांना लोअर पॅन्ट, टि-शर्ट, चप्पल, ब्लॅकेट, मुलींना सायकल, नोटबुक, पेन, स्कुल बॅग, फ्रॉक, चॉकलेट, बिस्कीट, मुलांना क्रिकेट बॅट, बॉल, व्हॉलीबॉल नेट, व्हॉलीबॉल इत्यादी विविध साहित्यांचे वाटप करण्यात आले. अतिदुर्गम भागात नवीन पोलीस मदत केंद्राच्या उभारणीमुळे तेथील नागरिकांनी संतोष व्यक्त करुन पोलीस प्रशासनाप्रती आभार व्यक्त केले.
सदर नवीन पोलीस मदत केंद्र उभारणीच्या कार्यक्रमाप्रसंगी विशेष पोलीस महानिरीक्षक, पश्चिम क्षेत्र, केंद्रीय राखीव पोलीस बल टी. विक्रम, विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) संदिप पाटील, पोलीस उपमहानिरिक्षक गडचिरोली परिक्षेत्र अंकित गोयल, पोलीस उपमहानिरिक्षक, केंद्रीय राखीव पोलीस बल, गडचिरोली अजय कुमार शर्मा, गडचिरोली जिल्ह्राचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल, कमांडण्ट 113 बटा. केंद्रीय राखीव पोलीस बल जसवीर सिंग, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक, अहेरी श्रेणिक लोढा, उपविभागीय पोलीस अधिकारी, भामरागड अमर मोहिते व पोलीस मदत केंद्र पेनगुंडाचे नवनियुक्त प्रभारी अधिकारी सपोनि. गणेश फुलकवर, इतर अधिकारी व पोलीस अंमलदार उपस्थित होते.