-गावागावात पटवून दिले व्यसनाचे दुष्परिणाम
The गडविश्व
गडचिरोली, दि. २४ : ग्रामीण भागात दारू व तंबाखूचे वाढते व्यसन गाव विकासात अडसर निर्माण करीत आहे. ही बाब गावा-गावातील लोकांच्या लक्षात यावी, याकरिता निर्माण, मुक्तिपथ आणि मानसिक आरोग्य विभाग (सर्च) यांच्या संयुक्त विद्यमाने धानोरा तालुक्यातील चातगाव ते साखेरा शोधयात्रा काढण्यात आली.
ग्रामीण भागात वाढत चाललेल्या दारू आणि तंबाखूचे सेवन, व्यसनामुळे होणारे आजार व एका माणसाच्या व्यसनामुळे पूर्ण कुटुंबावर होणारा त्रास, महिल्यांवर अन्याय हे सर्व प्रकार अवैध दारूमुळे घडून येतात. दारूच्या व्यसनामुळे आर्थिक, आरोग्याचे नुकसान तर होतातच तसेच सामाजिक भान सुद्धा राहत नाही. त्यामुळे दारूविरोधातील लढ्यात गावागावातील नागरिक सहभागी व्हावे, या उद्देशाने सर्च अंतर्गत निर्माण, मुक्तिपथ आणि मानसिक आरोग्य या विभागाच्या वतीने शोधयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. ही यात्रा चातगाव ते साखेरा दरम्यान काढण्यात आली. दरम्यान, कटेझरी, खुटगाव येथील गाव संघटनच्या महिलांनी युवकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या दोन्ही गावातील महिलांनी पुढाकार घेत आपल्या गावाला अवैध दारूच्या संकटातून मुक्त केले आहे. गावागावात महिला, पुरुष, युवक, युवती खंबीरपणे दारूबंदीसाठी उभे असले तर गावात नाही तर संपूर्ण जिल्ह्यात अवैध दारू विक्री बंद होऊ शकते. आमच्या गावाची प्रेरणा इतर गावांनी घ्यावी असे आवाहन सुद्धा संबंधित गावातील महिलांनी केले. या यात्रेच्या माध्यमातून दारूबंदी का गरजेची आहे, ही बाब ग्रामस्थांना पटवून देण्यात आली. या पदयात्रेत गडचिरोली जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यातील एकूण ६५ युवा व युवतींनी सहभाग नोंदविला.