बिजापूर येथील पत्रकार मुकेश चंद्राकर यांच्या हत्येनंतर भारतातील पत्रकारांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. भारत हा लोकशाही प्रधान देश आहे. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो पण आज याच चौथ्या स्तंभाच्या सुरक्षितेचा सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यातील बासागुड्डा येथे मुकेश चंद्राकर यांचा जन्म झाला. बस्तर मधील बिजापूर जिल्ह्यातील बासागुड्डा हे गाव माओवादी बंडखोरीचे मुख्यालय होते. वयाच्या तिसऱ्या वर्षी त्यांने त्याच्या वडिलांना गमावले. कमी वयातच वडिलांचे छत्र हरवल्यामुळे गावातील आदिवासींच्या मदतीने अंगणवाडी सेविका असलेल्या त्याच्या आईने त्याला वाढविले पण अचानक २००५ ते २००७ या काळात राज्य अनुदानित माओवादी विरोधी सलवा जुडुम सक्रिय असतांना त्यात त्याचे अख्खे गाव उध्वस्त झाले.
त्यानंतर त्याच्या आईने त्याला सरकारी वस्तीगृहात पाठविले आणि गावापासून सुमारे ३२ किमी अंतरावर असलेल्या बासागुड्डा निर्वासित छावणीत त्या स्थलांतरित झाल्या. अशा हलाखीच्या दुःखद काळात मुकेशने शिक्षण घेतल्यानंतर स्वतःला बस्तरच्या आदिवासींना न्याय मिळवून देण्यासाठी समर्पित केले. २०१२ पासून मुकेशने पत्रकारितेला सुरुवात केली. २०१३ मध्ये मुकेशच्या आईचे कर्करोगाने निधन झाले. दुःखाचा एवढा मोठा डोंगर कोसळल्यानंतरही एकट्या पडलेल्या मुकेशने खचून न जाता लोकांच्या जीवनात नवीन आशा आणण्याचे ठरविले. पत्रकारितेच्या जगातला त्याचा प्रवास अचंबित करणारा आहे. एकादशकापेक्षा जास्त काळ त्याने विविध न्यूज चैनल मध्ये काम करून मुक्त पत्रकार म्हणून संघर्ष केला. त्यानंतर त्यांनी स्वतःचे बस्तर जंक्शन नावाचे युट्युब चॅनल सुरू केले. या दरम्यानच्या काळात ३ एप्रिल २०२१ ला छत्तीसगड मधील बिजापूर मध्ये कोब्रा कमांडो आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत नक्षलवाद्यांनी राकेश्वर सिंह मन्हास या कोब्रा कमांडो चे अपहरण केले. त्याला सोडवण्यासाठी जेव्हा सरकारने गुडघे टेकले, हार मानली त्यावेळेस ९ एप्रिल २०२१ ला पत्रकार मुकेश चंद्राकर हे कोब्रा कमांडो जवान यांना सोडवून आणण्यात यशस्वी झाले.
निर्भीड, सहासी असे अनेक शब्द त्याच्या व्यक्तिमत्वासमोर कमी पडतात. बस्तर जंक्शनच्या माध्यमातून मुकेशने नक्षलवाद ,भ्रष्टाचार , सामाजिक समस्या आदिवासींवर होणारे अन्याय यांसारख्या विषयांवर वेळोवेळी वार्तांकन केले. नक्षल कॅम्प लाईव्ह दाखवणारा, कमरेच्यावर पाण्यातही ग्राउंड रिपोर्टिंग करणारा, तीन- तीन दिवस पैदल प्रवास करूनही अबूजमाड भागातील समस्या हिरहिरीने समोर आणणारा पत्रकार एक जानेवारीला अचानक बेपत्ता झाला.
छत्तीसगड मधील निवडणुकीनंतर परिस्थिती मुकेशच्या विरोधात होती.
निवडणुकीदरम्यानही त्याच्यावर अनेकदा दबाव आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. अनेकदा धमक्याही देण्यात आल्या. धमक्यांबाबत पोलिसांना कळवूनही छत्तीसगड पोलीस प्रशासनाकडून त्याला कुठलीच सुरक्षा देण्यात आली नाही. अशातच रस्ता बांधकामातील भ्रष्टाचार उघड करणे त्याच्या जीवावर बेतले. बिजापूरच्या दुर्गम भागातील रस्ता बांधकामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याची बातमी त्याने केली. त्यानंतर कंत्राटदार सुरेश चंद्राकर आणि रितेश चंद्राकर याचा मुकेश चंद्राकर यांच्यासोबत वाद झाला.
कंत्राटदार सुरेश चंद्राकर हा काँग्रेसचा नेता आहे. हा तोच नेता आहे ज्याने स्वतःच्या लग्नात नवरी हेलिकॉप्टरने आणली, ज्याचे संबंध अनेक मोठ्या नेत्यांशी व प्रशासकीय अधिकाऱ्यांची आहे. १ जानेवारीला मुकेश चंद्राकर यांनी सर्व मित्रांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. दुपारी ३ वाजेपर्यंत शुभेच्छा देणे सुरूच होते. सायंकाळच्या दरम्यान रितेश चंद्राकरने मुकेश ला फोन करून बस स्टॅन्ड मागील चट्टानपारा मागील बॅडमिंटन कोर्टात बोलावले येथे मजुरांसाठी बांधलेल्या अनेक खोल्या आहेत. आरोपींनी धोक्याने मुकेशच्या डोक्यावर लोखंडी रॉडने मारून जखमी केले. त्यानंतर धारदार शस्त्राने त्याचा शरीरावर अनेक ठिकाणी वार केला त्यानंतर त्याचे हातपाय बांधून त्याला सेप्टिक टॅंक मध्ये टाकले व वरून सिमेंट रेतीची परत चढविण्यात आली.
इकडे दुसऱ्या दिवशी मुकेश चा भाऊ युकेश ला मुकेश कुठेच न दिसल्याने त्याने त्याच्या मित्रांना विचारपूस केल्यानंतर पोलीस स्टेशन गाठले व बेपत्ता असल्याची कंप्लेंट केली. पत्रकारांच्या दबावानंतर ३ जानेवारीला दुपारच्या सुमारास त्याचा मृतदेह आढळून आला आणि देशात एकच खळबळ माजली. बिजापूर मधील पत्रकार मुकेश साठी न्याय मागत आहेत. आतापर्यंत या केस मध्ये मुख्य आरोपी सुरेश चंद्राकर फरार असून ३ आरोपींना अटक झाली व चौकशी सुरू आहे.
मुख्य आरोपी सुरेश चंद्राकर फरार असून ३ आरोपींची चौकशी सुरू आहे.
गेल्या ४ वर्षांपासून मी मुकेश च्या संपर्कात होते. त्याची निर्भीड पत्रकारिता व त्याच्यवर असलेला भ्रष्ट सिस्टम चा दबाव मी जवळून अनुभवला आहे. गेल्या दीड वर्षांपासून त्याच्या जीवनावरील कादंबरीवर मी लेखन करीत आहे. मला दुःखा सोबत अभिमान ही आहे माझा मित्र , वाघासारखा पत्रकार मरतांना ही मृत्यू च्या डोळ्याला डोळा भिडवून शहिद झाला. पण प्रश्न हा उठतो की कधीपर्यंत मुकेश चंद्राकर सारख्या पत्रकारांना भ्रष्ट सिस्टीम मुळे आपला जीव गमवावा लागेल?
२०१४ पासून आतापर्यंत भारतात २८ पत्रकारांची हत्या झालेली आहे. २०१५ मध्ये शाहजहापुर युपी येथील जोगिंदर सिंह यांची रेती माफिया कडून हत्या करण्यात आली. रंजन राजदेव दिवाण बिहार २०१६ मध्ये अवैद्य उत्खनन च्या वार्तांकन केल्यामुळे हत्या झाली. त्यानंतर करुण मिश्रा, संदीप शर्मा, शुभम मनी त्रिपाठी, शशिकांत वारीक्षे अश्या कित्येक पत्रकारांची हत्या झाली असून अनेक केस मध्ये आजही आरोपी पकडले गेले नाहीत. आणखी किती बळी जाणार ?
भारतात एका पत्रकाराच्या जीवनाचे मूल्य काहीच नाही? भारतात पत्रकार खरंच सुरक्षित आहेत?
– स्वाधिनता बाळेकरमकर
8975134748