गडचिरोलीत पत्रकार मुकेश चंद्राकर यांच्या हत्येचा निषेध

90

– चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करण्याची निवेदनातून मागणी
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०९ : छत्तीसगड मधील बिजापूर येथील बस्तर जंक्शन चे पत्रकार मुकेश चंद्राकर यांची निघृण हत्या केल्याची घटना ३ जानेवारी २०२५ रोजी उघडकीस आली. या घटनेने देशभरात खळबळ उडाली असून या घटनेचे पडसाद देशभरात उमटले असताना पत्रकार मुकेश चंद्रकर यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील पत्रकारांनी एकत्र येत गुरुवार ९ जानेवारी २०२५ रोजी घटनेचा निषेध नोंदवित जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांना निवेदन सादर केले.
पत्रकार मुकेश चंद्राकार यांचे बस्तर जंक्शन नावाचे युट्युब चॅनल आहे. त्या माध्यमातून परिसरातील घडामोडी प्रत्यक्ष भेट देत ग्राउंड रिपोर्टिंग करून ते दाखवीत होते. दरम्यान एका रस्ता कामातील भ्रष्टाचाराची बातमी केल्याने त्यांची निघृण हत्या १ जानेवारी रोजी करून सांडपाण्याच्या टाकीमध्ये मृतदेह लपविण्यात आला होता. या घटनेची माहिती देशभरात पोहचल्याने याचे तीव्र पडसाद उमटायला लागले. दरम्यान गडचिरोली जिल्ह्यात अवैध धंद्यांना पेव फुटले आहेत, झटपट पैसे मिळविण्याच्या नादात युवा पिढीही या अवैध धंद्याच्या आहारी जात आहेत. जिल्ह्यात रेती, मुरूम तस्करी करण्याचे प्रमाण वाढले आहेत, अवैध धंद्यांचे माफिया जिल्हाभरात निर्माण झाले आहेत. असे असताना त्याबाबत बातमी केल्यास पत्रकारांच्या जीवास धोका निर्माण होण्याची शक्यता असून पत्रकार मुकेश चंद्राकर यांच्यासोबत घडलेल्या प्रकारची पुनरावृत्ती होण्याचीही शक्यताही निर्माण झाली आहे. तशी पुर्नरावृत्ती गडचिरोली जिल्हयात होवू नये म्हणून महाराष्ट्र शासन अधिनियम सन २०१९ क्र. १९ दिनांक ८ / १० / २०१९ राजपत्रानुसार जिल्ह्यातील पत्रकारांना संरक्षण देण्यात यावे आदी मागण्याकरीता गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मुकमोर्चा काढून जिल्ह्याधिकारी अविशांत पंडा व जिल्हा पोलीस अधिक्षक निलोत्पल यांच्या मार्फतीने राष्ट्रपती, पंतप्रधान,गृहमंत्री,महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री छत्तीसगड, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदिना मागण्याचे निवेदन देण्यात आले. यावेळी बहुसंख्य पत्रकार उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here