देसाईगंज : वाघाच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

697

The गडविश्व
देसाईगंज, दि. १४ : तालुक्यातील जंगल परिसरात वन्य प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. अशातच देसाईगंज नगरपरिषदे अंतर्गत येत असलेल्या जुनी वडसाच्या शेत शिवारात वाघाने हल्ला करून शेतकऱ्यास जखमी केल्याची घटना मंगळवार १४ जानेवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास घडली. गणपत केशव नखाते (वय ४६) रा. जुनी वडसा ता. देसाईगंज जि. गडचिरोली असे जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी गणपत नखाते हे आज नेहमीप्रमाणे सकाळच्या सुमारास गावापासून जवळच असलेल्या शेतावर गेले होते. शेतात काम करीत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला चढवीला त्यात ते जखमी झाले. शेतालगत वैनगंगा नदी असून आज मकर संक्रातीच्या दिवशी नागरिक आंघोळीला जात असतांना त्यांना वाघ निदर्शनास येताच आरडा ओरड करून वाघास त्या ठिकाणावरून पिटाळून लावले असता वाघाने कुरूडकडे धूम ठोकली. घटनास्थळी नागरिकांची मोठ्या संख्येने गर्दी पहावयास मिळाली होती. सदर घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून वाघाचा बंदोबस्त करण्यात यावा व जखमी शेतकऱ्यास तात्काळ मदत देण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. जखमीला देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली आहे. दरम्यान वन विभागाच्या वतीने वाघावर पाळत ठेवण्यात आल्याचे कळते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here