ग्रामपंचायत गट्टा येथील सरपंचावरील कारवाईच्या दिरंगाईविरोधात भाकप व आयटकचा आंदोलनाचा इशारा 

169

– १० फेब्रुवारीला जिल्हा परिषद समोर धरणे आंदोलन
The गडविश्व
गडचिरोली,०५ : ग्रामपंचायत गट्टामधील औषध खरेदी गैरव्यवहारात दोषी ठरलेल्या सरपंच व उपसरपंच यांच्यावर कारवाई करण्यास प्रशासनाची चालढकल सुरू असल्याने भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकप) आणि अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेस (आयटक) यांच्या नेतृत्वाखाली १० फेब्रुवारी २०२५ रोजी जिल्हा परिषद गडचिरोलीसमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
गेल्या सात महिन्यांपासून अन्याय, पण प्रशासन निष्क्रिय ग्रामपंचायत गट्टामध्ये औषध खरेदी प्रक्रियेत मोठा गैरव्यवहार झाल्याची तक्रार २७ जून २०२४ रोजी करण्यात आली होती. या तक्रारीनंतर पंचायत समितीने संपूर्ण चौकशी करून ६ सप्टेंबर २०२४ रोजी अहवाल सादर केला. या अहवालात ग्रामपंचायत सरपंच आणि उपसरपंच औषध खरेदी घोटाळ्यात दोषी आढळले. तथापि, अहवाल सादर होऊन पाच महिने उलटले तरी जिल्हा परिषद प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नाही. वारंवार पाठपुरावा करूनही जिल्हा परिषद ही संबंधित अधिकाऱ्यांना वाचविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भाकप आणि आयटकने केला आहे.
कारवाईच्या टाळाटाळीमुळे विभागीय आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली. त्यांच्या निर्देशांनंतर व सातत्याने दबाव टाकल्यानंतर १० जानेवारी २०२५ रोजी जिल्हा परिषदेने सुनावणी घेतली. त्या वेळी तक्रारदार सुरज जक्कुलवार यांनी लेखी व तोंडी आपली बाजू मांडली. जिल्हा परिषदेने त्यावर सरपंच व उपसरपंच यांचे म्हणणे ऐकून पुढील निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते.

१० फेब्रुवारीला तीव्र आंदोलनाचा इशारा

शासन निर्णयानुसार, सुनावणी एका महिन्यात पूर्ण होणे आवश्यक असताना पाच महिने उलटले तरीही प्रशासन कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहे. त्यामुळे भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकप) व आयटक यांनी १० फेब्रुवारी २०२५ रोजी जिल्हा परिषद कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. जर १० फेब्रुवारीपूर्वी दोषी सरपंच व उपसरपंच यांच्यावर कारवाई झाली नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा भाकप जिल्हा कार्यकारिणी सदस्य सुरज जक्कुलवार यांनी दिला आहे. तसेच, या संपूर्ण परिस्थितीसाठी जिल्हा परिषद गडचिरोली प्रशासन जबाबदार राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here