गडचिरोली : गोविंदपूर येथे नीलगायची शिकार, ५ आरोपी वनविभागाच्या ताब्यात

1603

– घटनास्थळावरून मास, कातडी व हत्यारे जप्त

The गडविश्व
गडचिरोली : जिल्हा मुख्यालयापासून १२ किमी अंतरावर असलेल्या गोविंदपूर जंगल परिसरात नीलगायची शिकार केल्याची घटना १७ फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी ५ आरोपींना जेरबंद करण्यात गडचिरोली वनविभागाला यश आले आहे.
निलकंठ भाऊराव भांडेकर, भाऊराव ढिवरू भांडेकर, धर्मा बळीराम गावडे, पत्रु बिलाजी भांडेकर, विठल गोसाई सोमनकर सर्व राहणार गोविंदपूर असे जेरबंद करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे.
गडचिरोली तालुक्यातील गोविंदपूर येथे नीलगायची शिकार केल्याची गोपनीय माहिती वनविभागाला प्राप्त झाली. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे वनाधिकारी व कर्मचाऱ्यांनी लगेच गोविंदपूर गाठून पत्रूजी भांडेकर यांच्या घरी चौकशी केली. दरम्यान त्यांच्या घरामागे शिजवलेले नीलगायचे मांस कचराकुंडीत आढळून आले. तसेच मांस ज्या ठिकाणाहून खरेदी करण्यात आले त्याठिकाणी अधिक तपास केला असता तनसीमध्ये चार किलो मांस लपवून ठेवल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी वनकर्मचाऱ्यांनी निलगायचे मांस जप्त करून सदर मांस पशूवैद्यकिय अधिकारी डॉ. लेखामी यांच्याद्वारे फॉरेंसिक लॅॅबकडे तपासणी करीता पाठविण्यात आले. काल या प्रकरणातील दोन आरोपींना पकडण्यात आले होत व इतर आरोपींचा शोध घेण्यात येत होता. आज या प्रकरणातील इतर ३ जणांना शिताफीने ताब्यात घेण्यात वनविभागाला यश आले आहे. घटनास्थळावरून मास, कातडी व हत्यारे जप्त करण्यात आले . याप्रकरणी आरोपींविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई गडचिरोली वनविभागाचे सहायक वनरक्षक सोनल भडके यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी अरविंद पेंदाम, मानद वन्यजिवरक्षक मिलींद उमरे, वन्यजीवप्रेमी अजय कुकूडकर, गुरवळाचे क्षेत्रसहायक अरूप कन्नमवार, डि. एन. दुर्गमवार, वनरक्षक गुरू वाढई, वनरक्षक प्रियंका रायपुरे, क्रिष्ना मडावी, सं. व. समिती अध्यक्ष गुरवळा निलकंठ गेडाम , मक्सुद सय्यद, विलास भोयर, देविदास सोदुरवार यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here