– अशोका विद्यापीठ,दिल्लीत प्रवेश मिळविणारा साहिल लोनबले ठरला पहिला आदर्श
गडचिरोली, दि. २८ : परीघावरील विद्यार्थांनी आपली वंचितता दूर करण्यासाठी मोठं मोठया विद्यापिठात जाऊन शिकण्याशिवाय पर्याय नाही. गावाखेड्यातील कुचकामी आणि दर्जाहीन शिक्षण घेऊन वंचित वर्गातील विद्यार्थ्यांचं काडीचाही फायदा होणार नाही आणि इथला वंचित,परीघावर असलेला वर्ग असं दर्जाहीन शिक्षण घेऊन मानवी आत्मसन्मान नसलेलं दर्जाहीन आयुष्य जगावं असं इथल्या जात,लिंग,वर्ग आधारित शोषणकारी व्यवस्थेला नेहमीचं वाटतं आलेलं आहे. ही या व्यवस्थेला बदल म्हणून व्हिजन समोर ठेवून नेचर फाउंडेशन ग्रामीण भागात काम करत आहे.याचे बीज म्हणजे साहिल लोनबले.
आरमोरी तालुक्यातील मोहझरी या ग्रामिण भागातील साहिल रमेश लोनबले याचे आई वडील शेतमजुरी करतात. साहिल चे प्राथमिक शिक्षण जि.प.मोहझरी शाळेत झाले तर माध्यमिक आकाश विद्यालय व महाविद्यालयीन शिक्षण शिवाजी कॉलेज, गडचिरोली येथून पूर्ण केले. गडचिरोलीत शिकताना राहणे, खाण्याचा खर्च घरच्यांना झेपत नसल्याने साहील स्वताचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी सकाळी वृत्तपत्र वाटप तर रात्री कॅटरिंग वर वाढप्याचे काम करायचा. अशाप्रकारे अडचणींना मात करत साहिलने बारावी मध्ये ८९ % गुण मिळवून कला शाखेत जिल्ह्यात पहिला आला.
पुढील शिक्षणाकरिता साहिल गडचिरोलीपुरताच न थांबता शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात त्याने पुण्यातील प्रसिद्ध अशा फर्ग्युसन कॉलेज मध्ये प्रवेश मिळवला. पण परत आर्थिक संकट संपले नव्हते मात्र यावेळी त्याला त्याच्या समाजातील लोकांची साथ लाभली आणि जिल्हा माळी समाज संघटना गडचिरोली यांच्या एक हात मदतीचा या उपक्रमाअंतर्गत त्याला संपूर्ण आर्थिक मदत करण्यात येत आहे. निवासाची व्यवस्था म्हणुन समाज कल्याण वस्तीगृह, विश्रांतवाडी, पुणे येथे त्याला प्रवेश मिळाला.
साहिल स्पर्धा परीक्षेपलीकडील दुनियेत जाण्यासाठी धडपडत होता. अशातच मित्र वरिष्ठ बंधू विशाल मसराम व नेचर फाउंडेशनचे निलेश नन्नावरे यांच्या मार्गदर्शनात देशातील नामांकित विद्यापीठांमध्ये जाण्याकरिता प्रवेश प्रक्रियेची तयारी करीत असतानाच नुकत्याच पहील्या फेरीत साहिलची निवड अझीम प्रेमजी विद्यापीठ, बंगळूर येथे एम.ए(डेव्हलपमेंट स्टडी) या पदव्युत्तर पदवी करिता झाली.
साहिल एवढ्यातच थांबला नाही तर यंग इंडिया फेलोशिप या अशोका युनिव्हर्सिटी दिल्ली च्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू असतानाच पुन्हा त्याने अर्ज केला. याबद्दल नेचर फाउंडेशन चे संस्थापक निलेश नन्नावरे, विशाल मसराम, श्रुती ताई यांनी साहिल ला मोलाचे मार्गदर्शन केले.
आणि पहिल्याच प्रयत्नात त्याची मुलाखती करिता आणि अंतिम यादीत निवड झाली आहे. अशोका विद्यापीठ, दिल्ली या ठिकाणी Young India Fellowship या Post Graduation Diploma in liberal studies या अभ्यासक्रमासाठी त्याची निवड झाली. या विद्यापीठांमध्ये वर्षभरामध्ये फक्त १०० विद्यार्थ्यांची निवड केली जाते. या ठिकाणी निवड होणारा साहिल हा कला शाखेतून आणि विशेष म्हणजे मराठी माध्यमातून निवड झालेला पहिला विद्यार्थी ठरला आहे. एवढंच नाही तर तो विदर्भातील पहिला विद्यार्थी ठरला.
विषेश बाब म्हणजे साहिल हा कोणतेही महागडे पैश्याची शिकवणी न लावता या ठिकाणीं पोहचला.
शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांसाठी काम करताना त्यांना गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षणाच्या संधी विषयी काहीच माहीत नाही. विद्यार्थ्यांमध्ये जसा माहितीचा अभाव आहे. तसच तो त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांमध्ये सुद्धा आहे. कारण त्यांच्या कुटुंबात तोच एक असतो जो पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करतो. आमच्या विद्यार्थ्याला माहितीच्या अभावी या बारावी नंतर उत्कृष्ट शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेण्याचा विचारही डोक्यात येत नाही. मग तो “12 नंतर डिएड नंतर बीएड आणि नंतर एम एड” नाहीतर मग “12 वी नंतर बीए,एम ए,बीएड, एम एड” अशा शिक्षणाच्या पारंपरिक चौकटीत अडकून राहतो. याही नंतर काय तर मग आणि घरच्यांना व नातेवाईकांना सांगण्यासाठी स्पर्धा परीक्षा”. विज्ञान शाखेचे विद्यार्थी सुद्धा यापेक्षा फारसा वेगळा विचार करताना दिसत नाही. हेच तो का करतो? त्यांचा नेमका उद्देश काय? तर याचं उत्तर त्याच्याकडे नसतेच.
ग्रामीण व तळागळातील विद्यार्थ्यांना नामांकित संस्थांमधील गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षणाच्या संधी काय आहेत? याची जागृती आणि मार्गदर्शन करण्यासाठी नेचर फाउंडेशन संस्था गेल्या चार वर्षांपासून ग्रामीण भागात कार्यशाळा आयोजित करीत आहे. यामुळे OBC,SC,ST,NT,VJ,NT,SBC या बहुजन विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची पारंपरिक शिक्षणाची चौकट मोडावी यासाठीच नेचर फाउंडेशन ग्रामीण भागात काम करत आहे.
या साहिल च्या प्रवेशाची चर्चा संपुर्ण गडचिरोली जिल्हात पसरली आहे. नेचर फाउंडेशन विदर्भातील विद्यार्थ्यांना गेल्या चार वर्षांपासून ‘लोकल टू ग्लोबल व ग्लोबल टू लोकल’ या थीम वर काम करून उच्च शिक्षणात देश स्वातंत्र्यनंतर ग्रामिण उच्च शिक्षणातील असणारी दुरी कमी करावी यासाठी कायमस्वरूपी अर्ज करून देण्यापासून तर कॉलेज, होस्टेल, प्रवेश मिळविण्यासाठी मोफत मार्गदर्शन व जबाबदारी घेऊन काम करीत आहे. याचाच फलित म्हणजे साहिल जो की एक स्वतः एज्युकेशन टीम सदस्य व नेचर फाउंडेशन समन्वयक आहे. अशी माहिती निलेश नन्नावरे संस्थापक नेचर फाउंडेशन यांनी दिली.

“माझ्या आतापर्यंतच्या शिक्षणात नेहमीच मोठे संकट आले आहेत, पण योग्य वेळी योग्य लोकांची साथ मला लाभत आली आहे. त्यामुळे मी प्रत्येक वेळी मला हव असलेल यश मिळवू शकलो. YIF हे माझ्या शैक्षणिक आयुष्यातील आतापर्यंतच सर्वात मोठ यश आहे. आशा आहे की मी माझ्या मेहनतीत सातत्य ठेवून परत यशाची नवी शिखरे सर करु शकेल.”
-साहिल लोनबले