– मोरी बांधकाम न झाल्याने सिमेंट पाइप रस्त्याच्या कडेला पडून
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि. ०१ : धानोरा ते ठाणेगाव या ४५ किलोमीटर रस्त्याचे काम मागील पाच वर्षांपूर्वी सुरू झाले, मात्र चार वर्षांनंतरही मोरीचे बांधकाम अपूर्ण आहे. परिणामी, रस्त्यावर टाकलेले सिमेंट पाइप जागोजागी पडून आहेत—कधी रस्त्याच्या कडेला, तर कधी शेतकऱ्यांच्या शेतात. मात्र, या समस्येकडे ना कंत्राटदाराचे लक्ष आहे, ना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचे. त्यामुळे पावसाळ्यात पाणी अडकून नवे संकट उद्भवू शकते, अशी शंका नागरिक व्यक्त करत आहेत.

अपूर्ण कामामुळे प्रवाशांचे हाल
रस्त्याचे काम सुरू केल्यानंतर तब्बल दोन वर्षे केवळ खोदकाम केले गेले, त्यामुळे प्रवाशांना आणि वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. एक वर्षापूर्वी डांबरचा दुसरा थर टाकून, रस्त्याच्या कडेला पांढरे पट्टे मारून आणि दिशादर्शक फलक लावून काम पूर्ण झाल्यासारखे दाखवण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात १२ ते १५ ठिकाणी टाकलेले सिमेंट पाइप तसेच पडून आहेत, आणि मोरी बांधकाम अपूर्ण आहे. याशिवाय, रस्त्याच्या रुंदीकरणाचा आणि झाडांची छाटणी करण्याचा प्रश्नही अनुत्तरित आहे.
काम अर्धवट, पैसा संपूर्ण?
धानोरा-ठाणेगाव मार्गाचे काम खासगी कंत्राटदाराला देण्यात आले होते. मार्च २०१९ मध्ये जेसीबीच्या साहाय्याने रुंदीकरणासाठी दोन्ही बाजूने खोदकाम करण्यात आले, मात्र प्रत्यक्ष कामात दिरंगाई झाली. प्रवाशांना मार्ग बदलावे लागले, वाहनधारकांना अडथळ्यांना सामोरे जावे लागले. मोरी बांधकामासाठी अनेक ठिकाणी सिमेंट पाइप टाकले गेले, परंतु काहीच ठिकाणी काम पूर्ण झाले. बाकीच्या ठिकाणी पाइप तसेच पडून आहेत, आणि आता ते बसवण्यासाठी पुन्हा रस्ता खोदावा लागणार आहे. त्यामुळे कंत्राटदाराने काम न करताच पैसे उचलले का, असा संशय नागरिक व्यक्त करत आहेत.
विहिरीगाव-कोरेगाव रस्त्याचे रुंदीकरण रखडले
४५ किलोमीटरच्या या मार्गात विहिरीगाव ते कोरेगाव आणि रांगी रस्त्याचे रुंदीकरण अपेक्षित होते. मात्र, कंत्राटदाराने हे काम न केल्यामुळे हा रस्ता अरुंद राहिला आहे. परिणामी, दोन वाहनांना समोरासमोर येताना ओव्हरटेक करणे कठीण जात आहे, आणि वारंवार अपघात होत आहेत.
रांगी-कोरेगाव रस्त्यावर झाडांची अडचण
रांगी ते कोरेगाव रस्त्यावर अनेक झाडे वाहतुकीस अडसर ठरत आहेत. वळणाच्या ठिकाणी ही झाडे धोकादायक ठरत असून, ती तोडणे आवश्यक आहे. मात्र, रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामादरम्यानही झाडे हटवण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.