गडचिरोली : “लोक नृत्य भारत भारती” महोत्सवाचा भव्य शुभारंभ

33

The गडविश्व
गडचिरोली, दि. १ : दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूर (संस्कृति मंत्रालय, भारत सरकार) आणि सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने “लोक नृत्य भारत भारती” महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव १ ते ३ मार्च २०२५ दरम्यान दररोज सायंकाळी ६.३० वाजता विद्याभारती कन्या हायस्कूल, गडचिरोली येथे रंगणार आहे.
महोत्सवाचे उद्घाटन शनिवार १ मार्च रोजी विद्याभारती कन्या हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे संस्थापक राजाभाऊ मुनघाटे, गडचिरोलीचे माजी आमदार नामदेव उसेंडी आणि समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन मडावी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूरचे सहायक संचालक (कार्यक्रम) दीपक कुलकर्णी आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र शासन, मुंबई (नागपूर विभाग) चे सहायक संचालक संदीप शेंडे यांच्या उपस्थित करण्यात आले.

पहिल्या दिवशी विविध रंगारंग लोकनृत्यांची सादरीकरणे

महोत्सवाच्या पहिल्या दिवशी प्रेक्षकांनी महाराष्ट्रातील प्रसिद्ध लावणी आणि कोळी नृत्य, मध्य प्रदेशातील बधाई व नोरता नृत्य, राजस्थानचे रंगीले नृत्य, कालबेलिया, भवाई आणि चरी नृत्य, हरियाणाचे घूमर आणि फाग नृत्य, गुजरातचे जोशपूर्ण सिद्धी धमाल नृत्य, ओडिशाचे संबलपुरी आणि दालखाई नृत्य, तसेच छत्तीसगडचे कर्मा नृत्य अशा विविध पारंपरिक लोकनृत्यांचा आनंद घेतला.
कलाकारांच्या अप्रतिम सादरीकरणाला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संपूर्ण सभागृह लोकसंगीत आणि नृत्याच्या तालावर उत्साहाने दुमदुमले.

संस्कृती जतन आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारा उपक्रम

हा महोत्सव संस्कृति मंत्रालय, भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य मंत्र्यांच्या संकल्पनेतून साकारला जात आहे. सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबईचे संचालक विभीषण चवरे, तसेच दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूरच्या संचालिका आस्था कार्लेकर यांच्या नियोजनात आयोजित करण्यात आला आहे.
भारतातील विविध संस्कृती आणि लोककला जतन करण्यासाठी तसेच नवीन पिढीला त्यांची ओळख करून देण्यासाठी हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. विशेषत: स्थानिक लोककला आणि कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन यांचा हा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे.

प्रेक्षकांसाठी विनामूल्य प्रवेश

या भव्य महोत्सवाच्या आयोजनासाठी दंडकारण्य शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संस्था, गडचिरोली यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य असून जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहून लोकसंस्कृतीचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here