गडचिरोलीत माओवाद्यांचा घातपाताचा कट उधळला

859

– स्फोटक साहित्य आणि भरमार बंदूक जप्त, पोलीस दलाची यशस्वी कारवाई
The गडविश्व
गडचिरोली, दि. १५ : जिल्ह्यात माओवाद्यांकडून सुरक्षा दलांवर हल्ले करण्यासाठी जंगल परिसरात विविध प्रकारची शस्त्रे आणि स्फोटके साठवून ठेवली जातात. अशा घातपाताच्या कारवायांना आळा घालण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सतत अभियान राबवत असते. अशाच एका शोध मोहिमेदरम्यान पोलिसांनी मोठा कट उधळून लावत स्फोटक साहित्य आणि भरमार बंदूक जप्त केली आहे.
15 मार्च 2025 रोजी भामरागड उपविभागातील नव्याने स्थापन केलेल्या पोस्टे कवंडे येथे तैनात असलेल्या विशेष अभियान पथकाच्या जवानांना गस्ती दरम्यान पोस्टे कवंडेपासून दक्षिणेला 100 मीटर अंतरावर पायवाटेच्या बाजूला झुडपांमध्ये लपवलेली भरमार बंदूक आढळली. याबाबत वरिष्ठांना माहिती देण्यात आली, त्यानंतर बीडीडीएस पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. शोध मोहिमेदरम्यान बंदूक आढळलेल्या ठिकाणीच आणखी एक संशयास्पद भाग आढळला. त्या जागेची पाहणी केली असता, जमिनीत दीड ते दोन फूट खोल डेटोनेटरसाठी वापरण्यात येणाऱ्या लाल रंगाच्या वायरने बांधलेली प्लास्टिकची पिशवी सापडली. बीडीडीएस पथकाने त्वरित एक्सप्लोझिव्ह किटच्या मदतीने तपासणी केली असता, त्यामध्ये स्फोटक पदार्थ असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सदर स्फोटक साहित्य घटनास्थळीच नष्ट करण्यात आले.
माओवादविरोधी मोहिमेला गती
या कारवाईत गडचिरोली पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक अहेरी सत्यसाई कार्तिक, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, भामरागड अमर मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्टे कवंडेचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक मंदार शिंदे, विशेष अभियान पथक व बीडीडीएस पथकाने ही मोहिम यशस्वीरीत्या पार पाडली.
पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी या कार्यवाहीत सहभागी जवानांचे कौतुक केले असून, माओवाद्यांनी हिंसक मार्ग सोडून आत्मसमर्पण करून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन केले आहे. तसेच, माओवादविरोधी मोहिम आणखी तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here