– परिसरात हळहळ
The गडविश्व
नागभीड, दि. १५ : सुट्टीचा आनंद साजरा करण्यासाठी पिकनिकला गेलेल्या पाच तरुणांचा घोडाझरी तलावात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शनिवार १५ मार्च रोजी सायंकाळी घडली. या घटनेने संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.
बुडालेल्या तरुणांची ओळख जनक किशोर गावंडे, यश किशोर गावंडे, अनिकेत यशवंत गावंडे, तेजस बालाजी गावंडे आणि संजय ठाकरे अशी पटली आहे. हे पाचही तरुण चिमूर तालुक्यातील सातगाव कोलारी येथील रहिवासी असून, त्यातील जनक आणि यश सख्खे भाऊ, तर अनिकेत आणि तेजस चुलत भाऊ असल्याचे कळते.
मिळालेल्या माहितीनुसार, हे पाच तरुण आणि त्यांचा एक मित्र असे सहा जण पिकनिकसाठी नागभीड तालुक्यातील प्रसिद्ध घोडाझरी तलावात गेले होते. ब्रिटिशकालीन हा तलाव निसर्गसौंदर्याने नटलेला असून, सुट्टीच्या दिवशी येथे पर्यटकांची मोठी गर्दी असते. हिरव्यागार जंगलाने वेढलेल्या या ठिकाणी पर्यटक बोटिंगसह जलविहाराचा आनंद घेतात. सकाळपासून पर्यटनाचा आनंद घेतल्यानंतर संध्याकाळी या तरुणांनी तलावात पोहण्यासाठी उडी मारली. मात्र, पाणी अपेक्षेपेक्षा अधिक खोल असल्याने ते बुडू लागले. यावेळी आर्यन हेमराज हिंगोली या युवकाने कसाबसा स्वतःला वाचवले, मात्र इतर पाच जण पाण्यात गटांगळ्या खाऊन बेपत्ता झाले. दरम्यान बचावलेल्या आर्यनने तातडीने ही दुर्दैवी घटना जवळील नागरिकांना सांगितली. माहिती मिळताच नागभीड पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले व पाण्यात बेपत्ता झालेल्या तरुणांचा शोध घेऊन लागले. काही वेळाने पाचही तरुणांचे मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आले. या दुर्घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #nagbhid #ghodajhari #ghodazarilake #breakingnews #shocking