The गडविश्व
ता. प्र/ कुरखेडा, दि. ०६ : रामनामाच्या जयघोषात आज कुरखेडा नगरी भक्तीच्या सागरात न्हाल्याचे दृश्य दिसून आले. श्रीराम नवमीच्या पावन पर्वानिमित्ताने आयोजित भव्य शोभायात्रा, आकर्षक झांक्या आणि छत्तीसगडहून आलेल्या अघोरी नृत्यकलाकारांनी संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले.
श्रीराम नवमी निमित्त विश्व हिंदू परिषद शाखा कुरखेडा, श्रीराम उत्सव समिती आणि श्रीराम मंदिर देवस्थान समिती यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीराम मंदिरात सकाळपासूनच विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. मंदिरात भक्तांची गर्दी, राम जन्मोत्सवाचे पारायण, भजन, कीर्तन, पूजन आणि आरती या सर्वांमुळे परिसर भक्तिमय झाला होता.
संध्याकाळी ७.३० वाजता श्रीराम मंदिरातून निघालेली भव्य शोभायात्रा हे या उत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरले. फटाक्यांच्या भडिमारात, डोल-ताशांच्या गजरात आणि वाजत-गाजत सजवलेल्या रथातून भगवान श्रीरामाचे भव्य तैलचित्र पुढे नेले गेले. यामध्ये पारंपरिक पोशाखातील दिंडी, स्त्रियांची कलश यात्रा, वाद्ययंत्रांचे सादरीकरण, तरुणांचे सामूहिक नृत्य आणि भगव्या झेंड्यांनी नटलेली रस्त्यांवरील सजावट यामुळे शहरात उत्सवाचे प्राचीन स्वरूप जागृत झाले.
या शोभायात्रेतील विशेष आकर्षण ठरले ते जबलपूर (छत्तीसगड) येथून आलेले अघोरी वेषातील नृत्यकलाकार, ज्यांनी पारंपरिक पद्धतीने सादर केलेल्या अघोरी नृत्याने नागरिकांना थक्क केले. त्यांच्या अनोख्या वेशभूषेने आणि भेदक सादरीकरणाने उपस्थितांची वाहवा मिळवली.
या शोभायात्रेत अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये विश्व हिंदू परिषदेचे माजी जिल्हाध्यक्ष वामनराव फाये, शहर विचार मंचाचे अध्यक्ष माधवदास निरंकारी, पंडित अविनाश दूबे महाराज, दोषहर फाये, भाजपा तालुका अध्यक्ष चांगदेव फाये, डॉ. जगदीश बोरकर, प्राचार्य नागेश फाये, मुख्याध्यापक देवेंद्र फाये, प्रा. विनोद नागपूरकर, नगरसेवक सागर निरंकारी, संस्कार पतसंस्थेचे अध्यक्ष मनिष फाये, मुरलीधर देशमुख, उल्हास देशमुख, राहुल गिरडकर, राहुल खोब्रागडे, कविता खडसे, कल्पना मांडवे, जागृती झोळे यांच्यासह हजारोंच्या संख्येने रामभक्त सहभागी झाले.
शोभायात्रेने शहरातील मुख्य मार्गांनी फेरी मारली आणि उत्सवाची सांगता मंदिरात आरतीने झाली. अखेर “सियावर रामचंद्र की जय” च्या गजरात हा दिव्य सोहळा भक्तांच्या मनात कायमचा कोरला गेला.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolinews #gadchirolipolice #kurkheda #RamNavami #JaiShriRam #KurkhedaCelebrates
#RamNavami2025 #BhavyaShobhayatra #RamNavamiProcession #HinduFestivals #DevotionAndCulture #VishwaHinduParishad #SpiritualIndia