मलेरिया नियंत्रणासाठीच्या कार्यगटाची पहिली बैठक सर्च शोधग्राम येथे संपन्न

50

The गडविश्व
गडचिरोली, दि. १२ : गडचिरोली जिल्ह्यात मलेरिया नियंत्रणासाठी राज्य शासनाच्या आदेशानुसार स्थापन करण्यात आलेल्या १४ सदस्यीय कार्यगटाची पहिली बैठक काल सर्च फाउंडेशन, शोधग्राम येथे कार्यगटाचे अध्यक्ष व सर्च फाउंडेशनचे संस्थापक डॉ. अभय बंग यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
या बैठकीस जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, उपमुख्यमंत्री यांचे सल्लागार डॉ. आनंद बंग, हिवताप, हत्तीरोग व जलजन्य रोग सहसंचालक डॉ. बबिता कमलापूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माधुरी किलनाके, गेट्स फाउंडेशनचे डॉ. अमोल पाटील, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. पंकज हेमके, सर्च फाउंडेशनच्या डॉ. सुप्रियालक्ष्मी तोटीगर, भामरागडचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनीष धकाते तसेच इतर सदस्य उपस्थित होते.
या बैठकीत दूरदृश्य प्रणाली (व्हिडीओ कॉन्फरन्सिंग) च्या माध्यमातून राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील तज्ज्ञांचा सहभाग होता. यात FDEC हिवताप सल्लागार डॉ. अल्ताफ लाल, माजी आरोग्य संचालक ओडिशा डॉ. मदन प्रधान, राज्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण संस्था नाशिकचे प्राचार्य डॉ. दावल साळवे, NIMR चे डॉ. हिम्मत सिंह आणि NVBDC दिल्लीचे माजी संचालक डॉ. निरज धिंग्रा यांनी सहभाग घेतला.
बैठकीत येत्या तीन वर्षांसाठी मलेरिया निर्मूलनासाठी तयार करण्यात आलेल्या कृती आराखड्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी प्रभावी नियोजन आणि जिल्हास्तरावरील सहकार्य यावर भर देण्यात आला.
या बैठकीद्वारे गडचिरोली जिल्ह्यात मलेरिया नियंत्रण आणि निर्मूलनाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकण्यात आले असून, स्थानिक आरोग्य यंत्रणा आणि तज्ज्ञांच्या समन्वयातून मलेरिया निर्मूलनाचे उद्दिष्ट साध्य करण्याचा निर्धार या यातून व्यक्त करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here