– शिवसैनिकांचा मृतदेहासह आक्रमक ठिय्या
The गडविश्व
देसाईगंज, दि. १५ : सरकारी आरोग्य यंत्रणेतील हलगर्जीपणा आणि संवेदनशून्य वर्तणुकीमुळे आदिवासी समाजातील गर्भवती महिला मनिषा शत्रुघ्न धुर्वे (३१) हिचा आणि तिच्या अजन्म्या बाळाचा हृदयद्रावक मृत्यू झाल्याची संतप्त घटना आज उघडकीस आली आहे. प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातील डॉक्टर आणि परिचारिकेच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे घडलेल्या या प्रकाराने संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आज देसाईगंज ग्रामीण रुग्णालयासमोर मृतदेहासह आक्रमक आंदोलन छेडत प्रशासनाला धडा शिकवण्याचा इशारा दिला.
१३ एप्रिल रोजी पहिलीच प्रसूती असलेल्या मनिषाला तिच्या कुटुंबीयांनी तातडीने विसोरा येथील उपकेंद्रात दाखल केले. वेळ उलटून जात असतानाही प्रसूती न झाल्याने कुटुंबीयांनी रुग्णवाहिकेची व्यवस्था केली. मात्र, डॉ. गणेश मुंडले आणि परिचारिका उके यांनी “थोडा थांबा, इथेच होईल प्रसूती” म्हणत रुग्णवाहिका परत पाठवली आणि याच निर्णयाने मनिषाच्या मृत्यूला कारणीभूत ठरले.
१२ तासांनंतरही प्रसूती न झाल्याने तिला अखेर ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. तेथून ब्रम्हपुरीच्या खासगी रुग्णालयात नेताना तिचा मृत्यू झाला. केवळ मनिषाच नव्हे, तर पोटातील निष्पाप बाळालाही जीव गमवावा लागला.
या प्रकारानंतर आज देसाईगंज येथील ग्रामीण रुग्णालयात शिवसेना नेते सुरेंद्रसिंह चंदेल यांच्या नेतृत्वात कार्यकर्ते व गावकरी रुग्णालयासमोर ठिय्या देत एकच “दोषी डॉक्टर आणि परिचारिकेवर तत्काळ निलंबन व फौजदारी गुन्हा दाखल करा, अन्यथा मृतदेह उचलू देणार नाही” अशी मागणी करीत होते. दरम्या. या आक्रमक भूमिकेमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांनी चौकशीचे औपचारिक आश्वासन देत सांगितले की, “दोष आढळल्यास कारवाई होईल.” मात्र, अशा घटनांमध्ये वारंवार आश्वासनं देऊन प्रकरण दाबण्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे नागरिक आणि आंदोलनकर्ते अधिकच संतप्त झाले आहेत.
या घटनेने आणखी एकदा ग्रामीण आरोग्यसेवेतील कुचंबणा आणि दुर्लक्षाचे विदारक रूप समोर आले आहे. आदिवासी महिलांची मातृत्वप्रक्रिया ही सरकारी हलगर्जीपणामुळे थांबावी, हे केवळ धक्कादायकच नाही तर मानवीतेला काळिमा फासणारे आहे. दोषींना फक्त निलंबन नव्हे, तर कठोर फौजदारी कारवाई व्हावी, हीच जनतेची एकमुखी मागणी आहे.
