The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. १७ : महसूल विभागाने रेती चोरी रोखण्यासाठी उभारलेल्या चौक्याजवळ लावलेल्या रेडियम नसलेल्या, अंधारात न दिसणाऱ्या बॅरिगेट्समुळे कुरखेडा तालुक्यातील न्हानी फाट्याजवळ आज गुरुवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास गंभीर अपघात घडला. या अपघातात राजेंद्र बोरकर व गुड्डू बेनिराम सहारे हे दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले असून जखमींना तातडीने कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, राजेंद्र बोरकर यांची स्थिती चिंताजनक असल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे रेफर करण्यात आल्याची माहिती आहे.
हा अपघात महसूल विभागाच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचा आरोप करत स्थानिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. रेती माफियांना रोखण्यासाठी उभारलेली चौकी नागरिकांच्या जीवावर उठतेय, अशी टीका नागरिकांनी केली आहे. बॅरिगेट्सवर कोणतीही चेतावणी दर्शक रेडियम पट्टी नव्हती, ना कोणताही सिग्नल किंवा सूचनाफलक. यामुळे रात्रीच्या अंधारात वाहनचालकांना त्याचा अंदाज येणं कठीण जातं.
महाराष्ट्र वाहतूक नियमावलीनुसार, सार्वजनिक रस्त्यावर कोणतीही अडथळा निर्माण करणारी अडथळक (बॅरिगेट्स, खड्डे इ.) ही दृश्यरूपाने स्पष्ट असावी लागते, त्यावर रेडियम पट्ट्या, चेतावणी फलक अनिवार्य आहेत.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करून, भविष्यात अशा निष्काळजी कारवायांना आळा घालावा, अशी जोरदार मागणी आता नागरिकांकडून होत आहे.
