The गडविश्व
गडचिरोली, दि. १९ : दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी योग्य संधी आणि मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने गडचिरोली पोलीस दलाच्या ‘प्रोजेक्ट उडाण’ अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षा सराव पेपरला जिल्ह्यातील तब्बल ३४०० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
पोलीस दादालोरा खिडकी व यशोरथ टेस्ट सिरीज (मुंबई) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एक गाव, एक वाचनालय’ उपक्रमाअंतर्गत १९ एप्रिल रोजी ही परीक्षा पार पडली. गडचिरोली पोलीस मुख्यालयातील शहीद पांडु आलाम सभागृहासह जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांतील वाचनालयांमध्ये ही परीक्षा घेण्यात आली.
दुर्गम भागातील भामरागड, अहेरी, एटापल्ली, हेडरी व सिरोंचा येथील विद्यार्थ्यांचा सहभाग लक्षणीय ठरला. विशेष म्हणजे, नव्याने स्थापन झालेल्या पोलीस स्टेशन पेनगुंडा हद्दीतील १५ विद्यार्थ्यांनी देखील परीक्षेत सहभाग नोंदवून स्पर्धा परीक्षांविषयीचा वाढता उत्साह अधोरेखित केला.
या वेळी गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी शहीद पांडु आलाम सभागृहातील ११०० विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले, “जिद्द, चिकाटी आणि मेहनतीनेच यश मिळते. स्वतःसोबतच स्पर्धा करा आणि सातत्याने अभ्यास करून यशस्वी व्हा.”
यासोबतच त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात सुरु असलेल्या स्किलिंग इन्स्टिट्यूट अंतर्गत सॉफ्टवेअर, वेब आणि मीडीया डेव्हलपर कोर्सेसची माहिती विद्यार्थ्यांना दिली.
या उपक्रमासाठी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, विविध पोलीस ठाण्यांचे अधिकारी, नागरी कृती शाखा तसेच पो.उ.नि. धनंजय पाटील व चंद्रकांत शेळके यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांनी अथक मेहनत घेतली.
स्पर्धा परीक्षा तयारीसाठी पोलीस दलाचा पुढाकार हाच सामाजिक बदलासाठीचा सकारात्मक टप्पा ठरत असून ‘प्रोजेक्ट उडाण’मुळे गडचिरोलीतील होतकरू विद्यार्थ्यांना नवसंजीवनी मिळाली आहे, अशी प्रतिक्रिया शिक्षण व सामाजिक क्षेत्रातून व्यक्त होत आहे.
