“कोट्यवधींच्या नळ योजनेचा फज्जा, निमगावात पाण्यासाठी भटकंती, लोकांनी नळ कराला दिला नकार”

39

The गडविश्व
ता. प्र/धानोरा, दि. २० : तालुक्यातील निमनवाडा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या निमगावात सन २००५-०६ मध्ये जलस्वराज्य योजनेअंतर्गत सुरू करण्यात आलेली नळ पाणीपुरवठा योजना आज संपूर्णतः अपयशी ठरली आहे. गावात करोडो रुपयांची गुंतवणूक करून उभारलेली ही योजना सध्या केवळ कागदोपत्री उरली असून प्रत्यक्षात नागरिकांना थेंबभरही पाणी मिळत नाही.
गावातील २३०० लोकसंख्येसाठी इनवेल विहीर, ५५ हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी, पाईपलाईन व घरगुती नळ कनेक्शन देण्यात आले होते. परंतु केवळ सुरुवातीच्या दोन वर्षांनंतरच पाईपलाईन चोकअप, देखभाल अभाव आणि इंजिनिअरच्या निष्क्रियतेमुळे ही योजना पूर्णपणे कोलमडली.
आज स्थिती अशी की, गावकऱ्यांना उन्हाळ्यात पाण्यासाठी इतर गावांकडे धाव घ्यावी लागत आहे. नळ कनेक्शन असतानाही पाणी येत नसल्याने नागरिकांनी नळ कर भरण्यास नकार दिला आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीला लाईन बिलाचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
या योजनेसाठी लाखो रुपये खर्च करूनही पाणी नाही, देखभाल नाही, जबाबदारी नाही – असा सवाल गावकरी उपस्थित करत असून सरकार व प्रशासनाच्या हलगर्जीपणावर ताशेरे ओढले जात आहेत.
सरकारचा ‘पांढरा हत्ती’ ठरलेली ही योजना, आता गावकऱ्यांच्या संतापाचा केंद्रबिंदू बनली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here