काश्मीरमध्ये भीषण दहशतवादी हल्ला : बैसरनमध्ये पर्यटकांवर थेट हल्ला, २७ ठार

590

The गडविश्व
नवी दिल्ली, दि. २२ : काश्मीरमध्ये गेल्या सहा वर्षांतील सर्वात भीषण दहशतवादी हल्ला मंगळवारी पहेलगामजवळील बैसरन भागात झाला. ‘छोटे स्वित्झर्लंड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या निसर्गरम्य पठारावर अतिरेक्यांनी थेट पर्यटकांना लक्ष्य करत गोळीबार केला. या भ्याड हल्ल्यात किमान २७ पर्यटकांचा मृत्यू झाला असून २० हून अधिक जण जखमी झाले आहेत.
या घटनेनंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली असून, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि इतर राजकीय नेत्यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. हल्ल्यानंतर अमित शहा तातडीने श्रीनगरला दाखल झाले आहेत.
दुपारी तीनच्या सुमारास हा हल्ला झाला. अनेक पर्यटक बैसरन पठारावर निसर्गाचा आनंद घेत असताना सशस्त्र पाच अतिरेक्यांनी त्यांच्यावर अचानक गोळीबार केला. प्रत्यक्षदर्शींच्या मते, पर्यटकांना निवडून लक्ष्य करण्यात आले. बैसरन पठार मोकळे असल्याने पर्यटकांना लपण्यास जागा मिळाली नाही आणि मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली.
लष्कर-ए-तोयबाशी संबंधित ‘द रेसिडन्स फ्रंट’ या पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादी संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असल्याची माहिती असून घटनास्थळी लष्कर, सीआरपीएफ आणि पोलिसांनी तातडीने पोहोचून शोधमोहीम सुरू केली. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी चारही दिशांना पथके रवाना करण्यात आली आहेत. हल्ल्यानंतर स्थानिक नागरिकांनी मदतीचा हात पुढे करत खेचरांच्या सहाय्याने जखमींना रस्त्यापर्यंत पोहोचवले आणि त्यानंतर रुग्णवाहिकांद्वारे पहेलगाम व अनंतनाग येथील रुग्णालयांमध्ये हलवण्यात आले.
या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी म्हणाले, “हल्लेखोरांना माफ केले जाणार नाही. त्यांचे दुष्ट हेतू कधीही सफल होणार नाहीत. दहशतवादाविरोधातील आमचा लढा अधिक तीव्र होईल. जखमींना लवकर आराम मिळावा, अशी प्रार्थना करतो.”
जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी हल्ल्याचा तीव्र निषेध करत दहशतवाद्यांना ‘अमानवी श्वापदे’ असे संबोधले. “गेल्या काही वर्षांत नागरिकांवर झालेला हा सर्वांत मोठा हल्ला आहे,” असे त्यांनी नमूद केले.
केंद्र सरकारकडून अनुच्छेद ३७० हटवल्यानंतर काश्मीरमध्ये शांतता नांदत असल्याचा दावा वारंवार करण्यात येत होता. यंदा देशी आणि विदेशी पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचेही सरकारने सांगितले होते. परंतु या हल्ल्यामुळे त्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, काश्मीरमधील सुरक्षाव्यवस्थेवर नवे आव्हान उभे ठाकले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here