The गडविश्व
ता. प्र/धानोरा, दि. २३ : गडचिरोली जिल्ह्याच्या ग्रामविकास कार्यात योगदान देणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांची राज्य पातळीवर निवड होऊन जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. धानोरा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या नवरगाव ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी खुशाल नेवारे यांना सन 2022-23 साठी तर देसाईगंज तालुक्यातील तुळशी ग्रामपंचायतीच्या वंदना सहदेव वाढई यांना 2023-24 या वर्षासाठी राज्यस्तरीय आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार जाहीर झाला आहे.
ग्रामविकास विभागाने 15 एप्रिल 2025 रोजी प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती व नागपूर विभागातील गुणवंत ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची राज्यस्तरीय यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यामध्ये गडचिरोली जिल्ह्याचा द्विगुणीत सन्मान झाला आहे.
या पुरस्कारांतर्गत जिल्हा परिषद स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांची निवड होऊन यशवंत पंचायत राज अभियान अंतर्गत त्यांना ग्रामविकास मंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येते. पुरस्कारात प्रशस्तीपत्रक आणि गौरवचिन्ह देऊन त्यांच्या कार्याचा सन्मान केला जातो.
खुशाल नेवारे व वंदना वाढई यांनी त्यांच्या कार्यकुशलतेतून ग्रामपंचायतीच्या कामकाजात पारदर्शकता, लोकसहभाग आणि प्रभावी प्रशासनाची उदाहरणे सादर केली. त्यांच्या निवडीमुळे जिल्ह्यात सर्वत्र आनंदाचे वातावरण असून, सहकाऱ्यांकडून व ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.
या निवडीमुळे गडचिरोली जिल्ह्यातील प्रशासनात नवे प्रेरणादायी संकेत निर्माण झाले असून, हा सन्मान इतर ग्रामपंचायत अधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice )