– चोरट्यांविरुद्ध तातडीने कारवाईची मागणी
The गडविश्व
ता. प्र/ धानोरा, दि. २३ : तालुक्यातील मोहली गावात घडलेली बैलजोडी चोरीची घटना शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. दिनकर देवाजी मडावी यांच्या मालकीची बैलजोडी 18 एप्रिल 2025 रोजी शुक्रवारी मध्यरात्री 2 ते 3 वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी गोठ्यातून चोरून नेली. सदर घटनेने परिसरात दहशत पसरली आहे.
मडावी यांनी रात्री बैलजोडी गोठ्यात खुंटाला बांधून ठेवली होती. मात्र सकाळी उठल्यानंतर गोठा रिकामा दिसताच चोरीचा प्रकार उघडकीस आला. लाल रंगाचा व धामणा-पांढऱ्या रंगाचा अशा या बैलजोडीची अंदाजे किंमत 70 ते 75 हजार रुपये असून, येणाऱ्या शेती हंगामाच्या पार्श्वभूमीवर ही चोरी मडावी यांच्यासाठी मोठं आर्थिक संकट घेऊन आली आहे.
परिसरात दरवर्षी बैल चोरीच्या घटना घडत असून चोरांवर कठोर कारवाई न झाल्याने त्यांचे धाडस वाढत आहे. गावकऱ्यांनी यावेळी जोरदार संताप व्यक्त केला असून, चोरांचा तातडीने शोध घेऊन कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
शेतीच्या मुख्य हंगामात बैलजोडी गमावलेल्या मडावी यांच्यासह परिसरातील शेतकरी हताश असून पोलिस प्रशासनाने या चोरीचं गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ पावलं उचलावीत, अशी एकमुखी मागणी होत आहे.

#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolinews #crimenews