कुरखेडा : जलकुंभ जाहिरातींचे अड्डे, पाणी टंचाईने नागरिक संतप्त

153

The गडविश्व
ता. प्र/ कुरखेडा (चेतन गहाणे) दि. २६ : तालुक्यातील मालदुगी व जांभुळखेडा येथील जलकुंभांवर रंगरंगोटी करून मोठमोठ्या जाहिराती झळकवल्यामुळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जल जीवन मिशनअंतर्गत प्रत्येक घरात शुद्ध पाणी पोहोचवण्याचे उद्दिष्ट असताना, जलकुंभ जाहिरातींचे केंद्र बनल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे.
दरम्यान जलकुंभांवरील जाहिरातीसाठी परवानगी कोणी दिली, याची माहितीच नागरिकांना मिळत नाहीये. ग्रामपंचायत वा अन्य प्रशासकीय यंत्रणेकडून स्पष्टता नसल्याने पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोप केला जात आहे. सार्वजनिक मालमत्तेचा असा व्यावसायिक वापर का आणि कशासाठी, असा संतप्त सवाल गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
“टाकीवर जाहिराती लावण्यापेक्षा नियमित पाणीपुरवठा करा,” अशी थेट मागणी ग्रामस्थांनी केली आहे. जल जीवन मिशननुसार प्रत्येक व्यक्तीस दररोज ५५ लिटर शुद्ध पाणी मिळायला हवे, पण प्रत्यक्षात पाणीपुरवठा अपुरा आणि विस्कळित आहे. भूजलावर अवलंबून असलेल्या गावांमध्ये पाण्याची भीषण टंचाई आहे.
ग्रामपंचायतीने या प्रकाराकडे डोळेझाक केल्याचा आरोप करत, ग्रामसभेत खुली चर्चा घ्यावी व जाहिरातींमधून झालेल्या उत्पन्नाचा हिशेब द्यावा, अशी गावकऱ्यांची मागणी आहे. मुंबई ग्रामपंचायत अधिनियमानुसार पाणी योजनांची जबाबदारी ग्रामपंचायतीवर असतानाही, प्रशासनाची उदासीनता ठळकपणे दिसून येत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, एका निम-शासकीय कंपनीने टाक्यांची देखभाल आणि रंगरंगोटीच्या बदल्यात जाहिराती लावण्याचा करार केला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, याबाबत कोणताही अधिकृत दस्तऐवज वा माहिती उपलब्ध नसल्याने नागरिक संभ्रमात आहेत.
“हर घर जल” ही घोषणा प्रत्यक्षात फसवी ठरत असून, जाहिरातबाजीपुरतीच उरते की काय, अशी शंका नागरिकांनी व्यक्त केली आहे. जलकुंभावरील जाहिराती हटवून तातडीने प्रभावी पाणीपुरवठा सुरू करावा, भूजल बळकटीकरणावर भर द्यावा, अशी ठाम मागणी सध्या जोर धरत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here