गडचिरोली : अवैध उत्खननावर महसूल विभागाची कारवाई, २९ लाखांचा दंड ठोठावला

70

The गडविश्व
गडचिरोली, दि.२७ : जिल्ह्यात वाळू, मुरूम आणि मातीच्या अवैध उत्खननावर महसूल प्रशासनाने जोरदार हल्ला चढवत अवघ्या पंधरवड्यात तब्बल ४७ प्रकरणांत २९ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. यामध्ये सर्वाधिक म्हणजे ४३ कारवाया वाळूच्या उत्खननावर, ३ मुरुमाच्या आणि १ मातीच्या प्रकरणावर करण्यात आल्या.
गडचिरोली आणि चामोर्शी तालुक्यांमध्ये सर्वाधिक बेकायदा उत्खनन उघडकीस आले असून, प्रशासनाने या भागांत धडक कारवाया केल्या आहेत. जिल्ह्याच्या प्रत्येक तहसील व उपविभागीय स्तरावर तपासणी पथकांची नियुक्ती करण्यात आली असून, नियमित छापे टाकून अवैध उत्खनन व वाहतूक रोखली जात आहे.
दरम्यान, जिल्ह्यात ६ अधिकृत वाळू डेपो सुरू करण्यात आले आहेत. या डेपोवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी तहसीलदार व उपविभागीय अधिकाऱ्यांवर सोपवली आहे.
“अवैध उत्खनन वा वाहतूक आढळल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही. दोषींवर कठोर दंडात्मक कारवाई केली जाईल,” असा थेट इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here