The गडविश्व
गडचिरोली, दि. २९ : येत्या १ मे २०२५ रोजी महाराष्ट्र दिन साजरा होणार आहे. यानिमित्त विविध राजकीय पक्ष, संघटना आणि नागरिकांकडून धरणे, मोर्चे, आंदोलने, सभा किंवा सार्वजनिक कार्यक्रम आयोजित होण्याची शक्यता लक्षात घेता, जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) व (३) अन्वये संपूर्ण जिल्ह्यात दिनांक २६ एप्रिल २०२५ रोजी मध्यरात्रीपासून ते १० मे २०२५ रोजी रात्री १२ वा.पर्यंत जमावबंदी आदेश लागू केला आहे.
या कालावधीत शस्त्रास्त्र, दाहक व स्फोटक पदार्थ, दगड, क्षेपणास्त्रांची उपकरणे यांचा वापर किंवा वाहतूक, तसेच सभ्यता व नितीमत्तेला धक्का पोहचवणारी भाषणे, गाणी, चित्रफलक किंवा जनतेत अस्थिरता निर्माण करणारी कोणतीही कृती करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
याशिवाय उपविभागीय दंडाधिकारी किंवा संबंधित पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय कोणतीही मिरवणूक काढणे, तसेच पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींनी सार्वजनिक ठिकाणी एकत्र येणे पूर्णतः मनाई करण्यात आले आहे.
हा आदेश संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात लागू असून, उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
